Saturday 18 February 2017

रहे ना रहे हम (भाग २४)




“काय करतोयस?” आश्चर्याचा पहिला धक्का ओसरल्यावर मी कसंबसं विचारलं. झाडांमध्ये सगळं गचपणी झालेलं. त्यात रात्रभर पाऊस पडलेला. दोघांच्या या झटापटीमध्ये फांद्यांच्या पानापानांवर असलेलं पाणी सगळं खाली टपाटपा सांडलेलं. तेच पाणी माझ्य अंगाखांद्यावर.
त्यानं उत्तर दिलं नाही, परत मला तितक्याच जोरात जवळ खेचलं. इतके दिवस मी आफताबसोबत राहिले होते. इतक्यांदा सेक्स केला होता, पण त्या प्रत्येक वेळी त्याचा अलवारपणे उलगडत जाणारा प्रणय आवडायचा. हा मात्र एकदम रानटी दांडगट. त्याचे दोन्ही हात माझ्या मानेवर होते, ओठ माझ्या ओठांवर. इतकं घट्ट पकडलं होतं की..
अखेर सर्व शक्ती पणाला लावून मी त्याला दूर केलं.
“मॅड झालायंस का?”
“घरात चल ना” तो परत माझा हात धरत म्हणाला. रात्रभराच्या जागरणानं तारवटलेले डोळे, विस्कटलेले केस.
“अजिबात नाही. आई वाट बघतेय. आणि हे काय चालवलं आहेस? गल्लीत कुणी पाहिलं म्हणजे..”
“बघू देत ना, एकतर मी कविताकडून निरोप पाठवला, इकडे येऊ नकोस तरी आलीस मग..आता पनिशमेंट”
“कुणाला समजलं तर.”
“तोच तर तुझा प्लान आहे ना? आय मीन, मुंबईत तर मला म्हणालीस की, आईला मी सर्व सांगणार आहे.. म्हणून तर मी रातोरात आलो”
“म्हणजे? मी आईला सांगणार आहे, प्रात्यक्षिक नाही करून दाखवायचंय!! ”
“इडियट. समजा, तू घरी सांगितलं आणि यतिनकाकाने एकदम अमरिश पुरी मोड ऑन केला आणि तुला मुंबईला परत पाठवलंच नाही तर.. म्हणून मी आलोय, दोघं मिळून काय ते सांगू”
“माझा बाबा असं काही करेल असं मला वाटत नाही. पण जर चुकूनमाकून आईनं तुला आणि मला असं पाहिलं अस्तं तर काही खरं नाही. मेलोच समज!”
“असं म्हणजे कसं?” तो परत मला जवळ ओढत म्हणाला. “तू काल घरातून बाहेर पडलीस आणि एकदम एकटा झालो. गेल्या कित्येक महिन्यांत असा एकटा कधी राहिलोच नव्हतो. तुझ्याशिवाय...”
“रोज आपण ऑफिसला जातो तेव्हा वेगवेगळे असतोच की”
माझ्या डोळ्यांत थेट बघत तो म्हणाला, “बट दिस इज डिफ़रंट. काल अगदीच राहवलं नाही, म्हणून तुझ्या मागोमाग कार घेऊन निघालो”
“कुठे पार्क केलीस? मला कशी दिसली नाही.”
“च्यायला तुला त्या कारचीच काळजी भारी. तुलाच दिसू नये म्हणून साठ्येअंकलच्या बंगल्यामागे नेऊन लावली. खरंतर तुला घरी येऊन सरप्राईझ देणार होतो. पण तुलाच फार घाई. सरळ इकडे आलीस.”
“इथं तुझ्याशी गप्पा मारत बसले तर आईच शोधत येईल. अझरभाई नाहिये का?”
“त्यानं अर्ध्या गावाच्या मांडवांच्या इलेक्ट्रिकचं काम घेतलंय, आज दिवसभर तो काय येत नाही, म्हणूनच सांगतोय. घरात चल.. उरलेलं काम तिकडं पूर्ण करू”
मी त्याचा हात सोडला. “फटके देईन. हा काय तुझा उतावळेपणा. नवीन आहोत का आपण एकमेकांना? काल रात्री तर केलंय की”
“काय?”
“काय?”
“काय केलंय.. सांग ना. डीटेलमध्ये”
“मी आता निघतेय. कवीताला पाठवून देते. ती फुलं घेऊन येईल. तुझा हा वेडेपणा बास. मी घरी आईला आज काही बोलणार नाही. कारण दिवसभर पाहुणे येत असतील. पण उद्या सकाळी मी सांगणार आहे. तेव्हा तू ये. आईला जे काय डीटेलमध्ये सांगायचंय ते सांगायला.”
“मग ताई, माझी एक रीक्वेस्ट ऐकाल का? तुमच्या आईबाबांना सांगण्याआधी प्लीज आधी आपण जरा अझरभाईला बोलूया का?”
“तू सांग ना, मी माझ्या घरी सांगेन. तू तुझ्या घरी सांग”
“ऍज इफ़, अझर तुझा काहीच लागत नाहीस. तासन्तास त्याच्यासोबत जीटॉकवर गप्पा मारतेस... माझ्याघरी आणि तुझ्याघरी म्हणे. अजिबात नाही. उद्या सकाळी अझरभाईला सांगू.. मग तिघं मिळून यतिनकाकांना. उसके बाद जो होगा सो देखा जायेगा”
“आय डोण्ट बीलीव्ह दिस, माझ्या घरी सांगण्यासाठी इतका उत्सुक कसा काय झालायस? इतके दिवस तर या रिलेशनशिपला तुला नावही द्यायचं नव्हतं... मग आता अचानक असं काय झालं की... तू नक्की आफताब आहेस का? की काल मी इकडे आल्यावर मुंबईवर एलियन्सनी हल्ला केला आणि तुझं रूप घेतलं.”
“अमेरिकन सीरीयल बघून ना तुझा दिमाग खराब झायलाय”
“तुझी भाषाही बदलली. काय झालंय काय? लेट मी वॉर्न यु, तुला माझा बाबा माहित आहे ना? त्याला जर हे समजलं तर गोष्ट अधेमध्ये थांबणार नाही. लग्नापर्यंत जाईल. तुझी तयारी आहे ना?”
“इतकी सीरीयस का होतेस?”
“कारण, तुझ्या आणी माझ्या रिलेशनशिपमधले आधीच झोल”
“त्याबद्दल आता बोलून उपयोग नाही. तो भूतकाळ आहे. विसरायलाच हवा. तू आणि मी दोघांनीही फक्त आपल्या आजकडे लक्ष द्यायला हवंय. तुझा आणि माझा एकत्र असलेला आज. उद्या काय होईल याची चिंता न करता आणि काल काय झालं याची पर्वा न करता!”
“मी जरा टीव्हीवर न्युज बघून येऊ का? खरंच एलियन्सनी हल्ला केलेला आहे. किती चेंज झालायस”
“चल ना, घरात! दाखवतो तोच आफताब आहे की नाही. सगळीकडून चेक करून घे.”
“चालू झाला का परत चावटपणा. मी आता खरंच निघते” इतकावेळ निघते निघते म्हणूनही मी तिथंच थांबले होते. आता मात्र खरंच वळाले. “दुपारी घरी येशीलच!”
“उद्या सांगाणार आहेस ना?” तो एकदम गडबडून म्हणाला. “की आज दुपारी?”
“जेवायला ये. आज कविता उकडीचे मोदक करतेय. तू आलेला समजलं की आई बोलवेलच. म्हणून आधीच सांगून ठेवतेय”
मी झाडाची फांदी वर उचलून बाहेर पडले तेव्हा त्याने परत माझ्या मानेवर त्याचे ओठ ठेवले. “आय लव्ह यु!” इतक्या दिवसांत त्यानं पहिल्यांदा उच्चारलेलं हे वाक्य!
याहून जास्त रोमॅंटिक काय असू शकतं का? असतं याहूनही रोमॅंटिक काहीतरी या जगामध्ये असतं...
मी निघाल्यावर त्याने हसत गुणगुणत म्हटलेलं... “आसान है जाना महफ़िल से.. हो कैसे जाओगे निकल कर दिल से...ओ दिलबर दिल तो कहे तेरी राहो को रोक लू मै..
आई बिरहा की रात अब बतलादे क्या करू मै..”
>>>>>> 

घरी आले तेव्हा भटजी आलेले होते. माझी अंघोळ अजून झालेली नसल्याने मी ताबडतोब माझ्या बाथरूममध्ये गेले. आईला मी फुलं आणली की नाहीत याचा पत्ताच नव्हता. आईला तसा बराच गोष्टींचा पत्ता नव्हता- ते एक बरंच झालं म्हणा. मघाशी इतक्या दांडगाईनं त्याने त्याचे ओठ लावले होते की मानेवर व्रण उठला होता. तरी बरं, न्हायले म्हणून केस मोकळे सोडले होते. आईला तो दिसल्याबरोबर (दिसणार कसा नाही. बागेमध्येच केव्हाचा कोयती घेऊन कापाकापी करत होता) त्याला जेवायला बोलावलं. अझरभाईला पण तिनंच फोन केला.
पूजा, आरती वगैरे सर्व होऊन  जेवायला तसा उशीरच झाला. बाबा आणि अझर अगदी जेवायच्या वेळेला आले. गणपतीला नैवेद्याला म्हणून उकडीचे मोदक केलेले. एरवी घरात कुणीच फारसं आवडीनं मोदक खात नाही, अपवाद फक्त अझरचा. त्याला आवडतात म्हणून असं नाही पण वेगन झाल्यापासून फार कमी गोडाचे ओर्जिनल पदार्थ खाता यायचे. बाकी, नाहीतर दुधाऐवजी कणीक वगैरे उपद्व्याप करा. त्यात उकडीचे मोदक फार आधीपासून आवडीचे. आईला ते मोदक नीट वळता येत नाहीत. त्यामुळे आमच्याकडे कविताच ते काम करते. मला गोडाचं फारसं काही आवडत नाही, त्यामुळे नैवेद्यापुरता ताटात एक घेतला तरी बास. लहानपणी आई म्हणायची की मोदक खाल्ले की बुद्धी वाढते. सध्या बुद्धी  इतकी वाढली की मोदक खाल्ल्यावर नक्की वजन वाढणार हे समजलं होतं. माझी वजनवाढ हा गेल्या दोन वर्षांतला जरा महत्त्वाचा मुद्दा बनला होता. बीएससीनंतर माझं वजन जरा आटोक्यात आलं होतं. एमएससीला तर मी एकदम स्लिम ट्रीम वगैरे झाले होते पण नोकरीला लागल्यापासून परत ग्राम ग्राम वाढत  चालले होते. (यावर आफताबचा पीजे अशीच वाढलीस तर ग्रामपंचायतीची नगर परिषद होशील हां!)
जेवताना आम्ही दोघे तसे शांत होतो.  “ऑफिसला एकच दिवस सुट्टी होती. खूप दिवसांत गावी आलो नव्हतो म्हणून दोन दिवस सुट्टी काढली” असं आफताबनं सांगितलं. त्यावर आईनं मला “बघ तो सुट्टी काढून का होईना पण घरी येतो. नाहीतर तू महाराणी. अजिब्बात घरी यायला नको. काय असतं गं मुंबईत एवढं?” असा टोमणा मारला.
“तिकडे असेल कुणी त्यांचे प्रेमळ वगैरे” बाबा कशाला गप बसेल.  आल्यापासून विनाकारण मला चिडवत होता.
“उगाच काही बाबा. ऑफिसांत काम असतं. नवीन नोकरी आहे. वाटेल तश्या सुट्या घेता येत नाहीत. या आफताबचं काय... एक नोकरी गेली तर दुसर्‍या हजार मिळतील. आमच्यासारखा सामान्य एमएससी थोडीच आहे. चार्टर्ड अकाऊंटंट आहे” जुन्या काळी जेवल्यानंतर  पानांचं तबक फिरवायचे तसे आम्ही टोमण्यांचं तबक फिरवत होतो.
“नवीन नोकरी असली तरी तुला शनिवार रविवार सुट्टी आहे की.  माझ्यासारखं ऑफिसातलं उरलेलं काम घरी आणून निस्तरत बसावं लागत नाही.”
“माहिताय किती काम करतोस! अर्धावेळ तर फेसबूकावर असतोस”
“मी फेसबूकावर कितीवेळ आहे हे तुला समजत म्हणजे तू कितीवेळ असतेस गं ऑनलाईन” आता टोमण्यांचं टेबल टेनिस चालू झालं.
“मी ऑनलाईन कशाला असायला पाहिजे... मला काय...” आफताबनं एक भुवई उचलून माझ्याकडे पाहिलं. सुदैवानं मी आणि तो बडबडायला लागल्यावर आईबाबाचं लक्ष नव्हतं. “दिवसांतून सतत दिसतोस ऑनलाईन म्हणून म्हटलं” मी बाजू सावरून घेतली. तो गालात हसला. मीपण.
“काकी, मला परत जायचंय. दोन तीन ठिकाणी साईटवर चक्कर टाकून येतो. आफताब, तू येणार आहेस का?” जेवण झाल्यावर अझरभाईनं विचारलं.
“नाही, मी घरी जाऊन झोपेन. रात्रभर ड्राईव्ह करत आलोय”
अझर आणि आफताब घरी गेल्यावर मी आणि आई गप्पा मारत बसलो. म्हणजे, मी सोफ्यावर लोळत होते आणि आई घरामध्ये काहीबाही आवरत होती. सोबतीला नातेवाईकांमध्ये कुणाचं काय झालं. सागरदादाच्या बायकोचे काही किस्से, माझ्या मामानं नवीन घर बांधलं पण वास्तुशांतीला आईला बोलावलं नाही असे कायबाय किस्से चालू होते. मी ऐकून घ्यायचं काम करत होते, खूप दिवसांनी आई बोलतेय हेच मला भारी वाटत होतं. बाबा परत बाहेर गेला होता. सार्वजनिक गणपतींचं काहीतरी काम बघायला.
दुपारी चारनंतर गणपती बघायला कोण कोण येणार म्हणून आईनं मला हल्याहल्या करत उठवलं. मीच चहा केलेला बघून आईला खूप आश्चर्य वाटलं. “काये ना, आठवतं का? बारावीच्या अभ्यासाला मला पहाटे उठवून चहा करायला लावायचीस. तुझा तू करून घे म्हटलं की राग यायचा, आता एकदम बदललीस हो”
बारावी ते आज! खरंच मी किती बदलले माझं मलाच कळेना. अचानक मोबाईलवर मेसेज आला. आधीवाटलं आपल्याच हीरोचा असणार, पण प्रत्यक्षात हीरोच्या दादाचा होता. “दोन मिनिटं घरी येतेस?” म्हणजे बहुतेक हीरो दादाचा फोन घेऊन मेसेजामेसेजी करत असणार. मी काहीच उत्तर दिलं नाही. थोड्यावेळानं आमच्या घराचं गेट वाजलं. कोण आलं म्हणून बघायला बाहेर गेले तर अझरभाई उभा.
“मेसेज पाहिला नाहीस का?”
“तूच केला होतास का? मला वाटलं की..”
“ते बादशहा चारपाच मोदक खाऊन साखरेच्या कोमामध्ये पोचलेत. संध्याकाळपर्यंत डोळे उघडणार नाहीत.. एनीवेज, तुला मेसेज केला होता कारण तुझ्याशी थोडं बोलायचं होतं”
“बोल ना. घरात तरी ये”
“घरात नको. तूच बाहेर ये” गेटमधून मी बाहेर गेले. एकंदरीत अझरभाई बराचसा गंभीर दिसत होता. कधी नव्हे ते त्याचं असं किंचित रागवल्यासारखं बोलणं ऐकून मला जरा भितीच वाटली होती.
“काय झालं?”
“कधीपासून चालू आहे?”
“काय?”
“मी काय विचारतोय ते तुला नीट माहितीये, तेव्हा सरळपणे उत्तर दे. हे सारं कधीपासून चालू आहे?”
“ग्रेट. आफताबनं तुला सांगितलं!”

“तो मला काहीही बोलला नाहीये, पण जर तुम्ही दोघं समोर असताना.. एकमेकांकडे बघत असताना जर मला इतकी सिंपल गोष्ट समजली नाही तर लानत है मुझपे” एकदम अझरभाई हसला. त्याच्या इतर कुठल्याही वागण्यासारखं त्याचं हसूही तितकंच मृदू, संयत. पण हसताना त्याचे डोळे मात्र विलक्षण चमकायचे.
“आफताब तुला सर्व सांगणार आहे, त्याच्याआधी मी सांगितलं तर तो उगाच चिडेल. पण गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही एकत्र आहोत. तुझ्यापासून किंवा माझ्या घरच्यांपासून लपवून ठेवायचं नव्हतं, पण खरं सांगायची हिंमत नव्हती”
“आफताब मला घाबरतो हे एकवेळ मान्य करेन. पण तू आणि मी रोज इतक्या गप्पा मारत अस्ताना एकदाही बोलली नाहीस! यु शूड बी अ सीक्रेट कीपर”
“तुला मान्य आहे ना?”
“काय? तुमचं रिलेशनशिप! मला मान्य असल्यानसल्याने काय फरक पडतो? हां, मी खुश आहे, कारण आफताबला तुझ्यासारखी मुलगी मिळतेय. त्याच्या काही गर्लफ्रेंड्स  बघताना मलाच त्याची काळजी वाटली होती, पण तू, त्याच्यासाठी परफेक्ट आहेस. दोघं अगदी सेम आहात”
“जादू, हे कायपण. मी आणि आफताब. जगाच्या दोन टोकांवर आहोत. जरा तरी सेम आहोत का? तो एकदम पढाकू, स्कॉलर आणि मी ही अशी. फारसा अभ्यास न करणारी. तो सीरीअस. मी एकदम...”
“खुशमिजाज. पण हे सर्व खूप वरवरचं आहे. आतमध्ये, जिथे आपला आत्मा असतो तिथे तुम्ही दोघं सेम आहात. तुझ्यात आणि त्याच्यात काहीच फरक नाही. स्वभाव वेगळे असतील, पण तुम्ही आतमधून अगदी एकसारखे आहात. हीच गोष्ट मला फार खटकतेय स्वप्निल”
“खटकतेय? आता तर तू म्हणालास की या रिलेशनशिप्मध्ये”
“मला प्रॉब्लेम नाहीये. आय ऍम हॅपी फ़ॉर बोथ ऑफ यु, पण त्याचवेळी, स्वप्निल. बी केअरफ़ुल. वाटतं तितकं सोपं नाहीये. कुठलंच नातं सोपं नसतं, पण तू आणि आफताब, दोघंही एकाच सुंभाचे पीळ आहात. त्याला नाती खूप सहज साधी वाटतात, त्यामधले कॉम्प्लेक्सिटी त्याला नको हवी असते. ज्यावेळी गोष्ट त्याच्या मनासारखी चालू असते तोपर्यंत त्याला काहीच वाटत नाही. मनाविरूद्ध काही घडलं की, तो समजून घेणे, समोरच्याचंमत विचारात घेणे वगिअरे करण्यापेक्षा सरळ नातं तोडतो. इतके दिवस त्यानं एका नात्याला अक्षरश: फूटबॉलसारखं खेळताना आपण पाहिलंय.”
“तो त्याचा भूतकाळ झाला”
“पण माणूस तोच आहे ना? स्वप्निल, मी तुला घाबरवत नाहीये, फक्त धोक्याची सूचना देतोय. दोघांनाही इतकं चांगलं ओळखतो. आणि हे सर्व त्याला सांगितलं तर तो ऐकून घेणार नाही, पण तू ऐकशील, समजून घेशील. तितका समजूतदारपणा तुझ्याकडे आहे! हाच समजूतदारपणा कायम ठेव. हे नातंजर तुला सक्सेसफुल करायचं असेल तर दरवेळी तडजोड तुलाच करावी लागेल. तू आडमुठेपणा दाखवलास तर त्याच्याकडून तडजोड होणार नाही”
माझ्या आणि आफताबच्या नात्याचं इतकं लख्ख प्रतिबिंब दाखवणं जादूला कसं जमलं माहित नाही. पण त्यादिवधी दुपारी माझ्या घरासमोर उभं राहून त्यानं मला माझं भविष्य दाखवलं. दुर्दैव इतकंच की त्याचा हा सल्ला त्या रात्री मात्र माझ्या स्मरणांत बिल्कुल आला नाही. जर आला असता, तर आज मी आणि आफताब एकत्र असतो का? हू नोज!
>>>
दुसर्‍या दिवशी दुपारी गणपती विसर्जन झाल्यावर आफताब मुंबईला निघणार होता, मी रात्रीच्या ट्रेनने. तर त्यानं निघायच्या आधी आईबाबाला भेटायला यायचं आणि मग आम्ही आमच्या बाबतीत सांगायचं असं ठरलं होतं. पण नशीबाचे फासे परत एकदा फेकले गेले आणि पहाटे पाच वाजता आमच्या घरचा फोन वाजला.
अर्ध्यातासापूर्वी आजी गेली होती. रात्री तिच्या बेडरूममधून अवाज आला म्हणून काकू उठून गेली, पण ऍंब्युलन्स वगैरे बोलवेपर्यंत ती गेली होती. मॅसिव्ह  हार्ट ऍटॅक. काका आणि काकी स्वत: डॉक्टर असूनही काही करू शकले नाहीत. सगळीच समीकरणं धडाधडा बदलली. बाबानं त्याच्या दुकानामधल्या दोन कामगारांना घरी बोलावलं. लगोलग गणपती विसर्जनाला नेला. आईनं बॅगा भरल्या आणि आम्ही तासाभरामध्ये तर मुंबईकडे निघालो. काका म्हणाला होता, होईल तितक्या लवकर या. जास्त वेळ ठेवता येणार नाहीये. मला तर काहीच सुचत नव्हतं. बाबानं अझरला फोन करून आम्ही निघत असल्याचं कळवलं होतं. मी आफताबला मेसेज टाकला.
आमची गाडी हायवेवरून तीस किमी पुढे गेल्यावर त्याचं उत्तर आलं. मग बराच वेळ मेसेजवर बोलत राहिलो. आता आमचं सांगणं वगिअरे बाबी फार क्षुल्लक होत्या. आई तर फोन आल्यापासून रडत होती. बाबा रडत नसला तरी शॉकमध्ये हमखास होता.
आजीचं वय तसं फार नव्हतं, शिवाय तिला तसा काही फारसा आजारही नव्हता. मला आठवतं तशी माझी आजी फार टाकटूकीनं रहायची. स्वत:ची, स्वत:च्या आरोग्याची तिनं कायम काळजी घेतली. आईचं आणि तिचं फारसं पटायचं नाही, म्हणून ती काकूकडे राहायची. काकूचं आणि तिचंही तसं फारसं पटायचं नाही, पण काकू दिवसभर घराबाहेर असल्यानं वादावादीला टाईम जरा कमी मिळायचा, हाच एक फायदा. शिवाय सागर साहिल शाळेतून आल्यवर त्यांना आजी सांभाळायची. आमच्याकडे काय, आई कायमच घरी! माझं आणि आजीचं तसं फारसं सख्य नह्वतंच. एक तर मी मुलगी. ती पण अशी अशक्त आणि सारखी आजारी पडणारी. आईबाबानं फारच लाडावून ठेवलेली. आली की, मला काहीनाकाही तरी टोचून बोलायची, मला गाडी घेऊन दिली, कंप्युटर घेऊन दिला तरी  तिला आवडायचं  नाही. मुलीच्य अजातीला कशाला हवेत असले नखरे असं सरळ म्हणून दाखवायची. त्यावर आई म्हणायची, तुम्हाला मुलगी नाही ना, मग तुम्हाल अकसं कळणार?
पण आजी गेल्याचं दु:ख मला झालंच. माझे आजोबा बाबा लहान असतानाच गेले. आज्जीनेच दोघा मुलांना एकहाती वाढवलं. काका तर मुंबईमध्ये जाऊन डॉक्टर झाला. बाबा जास्त शिकला नाही पण किमान पैसा कमावता झाला. आज्जीने कुठल्याही नातेवाईकांची मदत न घेता हे सगळं केलं होतं. त्याकाळामध्ये एकट्या बाईनं आमच्या छोट्याशा गावामध्ये इतकं सारं करून दाखवणे सोपं खचितच नव्हतं. मला या बाबतीत आजीचा फार अभिमान वाटतो.
आम्ही काकाकडे जाईस्तोवत सर्व तयारी झाली होती. बाबा मोठा, म्हणून त्याच्यासाठी सगळे थांबले होते. घरी पोचल्या पोचल्या रडण्याचा एक एपिसोड झाला, मला रडू आलं नाही तरीही वाईट वाटलंच. साहिलदादा सागरदादापैकी कुणीही येण्यासारखं नव्हतं, त्यामुळे नातवंड अशी मीच एकटी. आम्ही पोचल्यावर लगेच हर्स बाहेर पडली, आणि स्मशानांत गेली. त्यांना कदाचित दुपारच्या गणपती विसर्जनाचं ट्राफिक लागलं अस्तं म्हणून त्यांनी जरा घाई केली. मी पाहिलेला हा दुसरा मृत्यू. अरिफभाईलातर मी गेल्यागेल्या पाहिलं होतं. झोपी गेल्यासारखाच तो दिसत होता. नंतर हॉस्पिटलमधून घरी आणला तेव्हा त्याचा चेहरा पाहण्याची हिंमत नव्हती.
 आज्जीला मात्र मी नीट पाहिलंच नाही, इतकी सर्वांची घाई चालू होती. तिचा म्हातारा सुरकुतलेला चेहरा ओघळला होता. डोळे बंद होते, जिभेवर तुळशीचं पान ठेवलं होतं, ओठांचे कोन एरवी सतत मुडपलेले असायचे, आज ते निसटले होते. तिला आम्ही येण्याआधीच अंघोळ घालून बांधलं होतं. आपल्यासमोर जे काही आहे, ते सर्व काही म्हणजे आज्जी नव्हे, हे अगदी मनोमन पटत होतं. आज्जी गेली आणि उरलंय ते फक्त तिचं पार्थिव. सकाळी घरामध्ये एका पार्थिव मूर्तीच्या छातीला हात लावून “प्राणप्रतिष्ठापना” केली होती. पण असं खरंच शक्य असतं का? अस्तं तर माणसं आपल्यापासून दुरावलीच का असती ना? आज्जी गेली हेच एक सत्य, बाकी सर्व आपल्याच शब्दंचे बुडबुडे.
आज्जीचं सर्व आटोपून दोन दिवसांनी आईबाबा गावी परत गेले. परत जाताना पनवेलच्या फ्लॅटवर थोडावेळ थांबले. तेव्हा आफताब ऑफिसमध्ये होता. आम्ही येणार माह्हित असल्याने त्यानं त्याचं सामान काढून ठेवलं होतं. गेले दोन तीन दिवस आमचं बोल्णं केवळ मेसेजांवर चालत होतं.

आईबाबाला आमच्याबद्दल सांगायचं मात्र राहूनच गेलं. खरंतर सांगायला हवं होतं, पण बाबा मन:स्थितीमध्ये नव्हता, अजून महिन्यादोन महिन्यांनी सांगू असं मीच आफताबला सुचवलं. एक मात्र होतं की, आम्ही त्यांना केवळ “आम्ही एकत्र राहतोय” हे सांगणार होतो. लग्नाबिग्नाचा विचार अजूनही केला नव्हता. म्हणजे... आफताबला करायचा नव्हता.
>>>>>>>


आमचं नातं एका अतिशय सुंदर पाऊलवाटेवर येऊन थांबल्यासारखं होतं. त्याला मी हवी होते, मला तो हवा होता. जगामधली कुठलीही गोष्ट मी त्याच्यासोबत शेअर करू शकत होते. एरवी त्यानं इतर कुणालाही सांगण्याची सुतराम शक्यता नसलेल्या गोष्टी तो मला सांगत होता. इतके दिवस मला वाटायचं की प्रेमात पडणं म्हणजे केवळ एखादी व्यक्ती आवडणं, ती हवीहवीशी वाटणं. पण आफताब माझ्या घरी आल्यापासून वाटायला लागलं की प्रेमात पडणं ही काय एकाच वेळी घडणारी लीनीअर प्रोसेस नाही. तुम्ही त्याच व्यक्तीच्या प्रेमात वारंवार पडू शकता. मी तर रोज एकदा नव्यानं आफताबच्या प्रेमात पडत होते. गेल्या सात वर्षांच्या मैत्रीमधला आफताब आणि आता माझ्या समोर असलेला आफताब हे दोघंजणू भिन्नच होते. माझा मित्र असलेला आफताब अतिशय शांत, गंभीर, पुस्तकी आणि खडूस होता, पण आता जाणवलं की तो किती मस्तीखोर, मजेदार आणि अधीर आहे. त्याच्या वागण्याची ही रासवट बाजू मला पहिल्यांदाच समजली होती. तरीही क्षणोक्षणी जाणवायचं की त्याला माझी किती काळजी आहे.. त्यानं मला माझीसुद्धा परत एकदा नव्यानं ओळख करून दिली. केदारनंतर मला वाटलं नव्हतं की मी परत कुणाहीवर इतकं जीव ओतून प्रेम करू शकेन. आफताबवर मी केवळ जीव ओतून प्रेम केलं नाही तर सगळं आयुष्य पणाला लावता येईल इतका जुगार खेळले.
यामध्ये त्याचं काय मत होतं? हे मी त्याला कधीच विचारलं नाही. आमच्यामध्ये जे काही चालू आहे ते केवळ शारिरीक लेव्हलवरती आहे की, इमोशनली पण तो माझ्यामध्ये गुंतलाय हे मला माहित नव्हतं. नकाराच्या शक्यतेपेक्षाही जर त्यानं नकार दिलाच तर माझ्या उद्धवस्ततेचं काय... हा विचार अधिक भेडसावत होता. परिणामी आहे हेच चालू द्यावं! तो माझ्यासोबत, माझ्या कुशीत आहे याहून अधिक काही अपेक्षा नव्हतीच.
गेले दोन चार दिवस चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं. एरवी अगदी वेळेवर येणारे माझे पीरीयड्स दोन तीन दिवस झाले तरी आले नव्हते. वारंवार मागच्या महिन्याचं कॅलेंडर पेज उघडून मी नक्की तीच तारीख होती का ते चेक करत होते. जरी प्रोटेक्टेड सेक्स असला तरी त्याहीमध्ये रिस्क असू शकते की. पण तसं काही घडेल असं कधी वाटलं मात्र नव्हतं. ऑफिसमध्ये कामात लक्ष लागत नव्हतं, दर अर्ध्यातासानं वाटायच, काहीतरी ओलं लागतंय! पण बाथरूममध्ये जाऊन चेक केलं की मामला क्लीअर असायचा. माझ्या बाजूला बसलेल्या देबजानीनं विचारलंसुद्धा “पेट खराब है क्या? कितनी बार लू जा रही है!” काय करावं ते सुचत नव्हतं. आफताब कामानिमित्त दिल्लीला गेला होता. अजून दोन दिवसांनी परत आला असता, तोपर्यंत मी काय करावं! इतके दिवस एकत्र राहणं, सेक्स, मज्जा इतकंच वाटत होतं. या कॉम्प्लीकेशनची कधी कल्पनाच केली नाही.
नेटवर गूगलमध्ये काहीबाही माहिती वाचत राहिले, पीरीयड्स लवकर यावेत म्हणून दिलेले काही अघोरी उपाय वाचले. पीरीयड्स उशीरा येण्याची प्रेग्नन्सी व्यतिरीक्त काही कारणं असतात तीपण वाचली पण मनाचं समाधान काही होईना, आजचा एक दिवस वाट बघायची, आणि उद्या डॉक्टरकडे जायचं. त्याआधी होम प्रेग्नन्सी टेस्ट करून बघायचं असं मनाशी ठरवलं. माझ्या घराच्या आजूबाजूला  कुणी गायनॅक नव्हत्या, आजूबाजूच्या दोन मेडीकलमध्ये विचारलं तर त्यांच्याकडे प्रेग्नन्सीकिट नव्हते.
उद्या गावामधल्या मोठ्या मेडीकलमध्ये जाऊन आणावे लागणार. च्यायला, हा एक वैतागच. रात्री नेहमीप्रमाणेच आफताबचा फोन आला, ही त्याची रोजची सवय. कामासाठी गावाबाहेर गेला की, डिनरला गेलं की मला कॉल लावणार. मग रात्री त्याचे किंवा माझे डोळे गपापा होईपर्यंत गप्पा मारणार. हा माणूस तासंतास माझ्याशी गप्पा मारू शकतो यावर माझा कित्येकदा विश्वास बसायचा नाही. इकडतिकडच्या चिक्कार गप्पा मारल्या. पण त्याला या प्रॉब्लेमबद्दल कसं सांगावं ते कळेना. समोर असला असता तर पटकन सांगता आलं अस्तं.
“काय झालं? जास्त बोलत नाहीस? टीव्हीवर सलमानखानचा पिक्चर लागलाय का?”
“नाही रे, तू सांगतोयस तेच ऐकतेय. परत कधी येणारेस?”
“उद्या संध्याकाळची फ्लाईट आहे, पण घरी पोचेपर्यंत रात्रच होईल. एअरपोर्टपासून पनवेल म्हणजे अल्मोस्ट तीन जिल्हे ओलांडून यायचंय मला”
“लवकर ये, आय मिस यु”
“ओहो. क्या बात है. आज एकदम मिसिंग वगैरे! इतना सेंटी तो मैने तुम्हे कभी नही देखा” तो चिडवत म्हणाला. एरवी मी त्याला उलटं काहीतरी चिडवलं अस्तं, पण आज मूड नव्हता. काहीतरी अशाच गप्पा मारून फोन ठेवून दिला.
दुसर्‍या दिवशी सकाळपर्यंत पीरीयड्स येतील असं वाटत होतं. किंचित पोटात दुखत पण होतं. मला नक्की कशाचं टेन्शन आलं होतं तेच समजत नव्हतं. जर मी गेली सहा महिने एका माणसाबरोबर रेग्युलर सेक्स करतेय, तर ही घटना घडू शकेल असं मला आधीच का वाटलं नाही. प्रोटेक्शनची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्याऐवजी मी पिल्स का सुरू केल्या नाहीत. त्याच्या अधीरतेमुळे काही धसमुसळेपणा घडला असेल आणि जर प्रेग्नन्सी असेल तर...
इतकावेळ केवळ पीरीयड्स आले नाहीत याचंच टेन्शन इतकं होतं की मी या तर मग... चा विचार केलाच नव्हता.  केदारसोबत माझं लग्न मोडायला (च्यायला, लग्न कसलं! अफेअर मोडायला! निधी करते ते लग्न आणि आपण करतो ते लफडं!!) मेजर कारण म्हणजे माझी रीप्रॉडक्टिव्ह हेल्थमध्ये लोचा असण्याची शक्यता हेच होतं. इतर मुलींपेक्षा उशीरा आलेले पीरीयड्स, त्याच्यासोबत सेक्स करूनसुद्धा काही न होणं आणि भरीसभर म्हणून माझ्या आईची हेल्थ कॉम्प्लिकेशन्स. त्यावेळेला मला जे काही ऐकायला लागलं त्यावरून मी स्वत:लाच “मां बनना” वगैरे गोष्टींपासून स्वत:ला तोडलं होतं. मी आणि केदारने स्वप्नरंजन करताना आपल्या मुलांची नावं काय ठेवायची इथपासून ते कुठल्या शाळेत घालायचं हे सर्व ठरवलं होतं पण नंतर मीच एकटीनं ठरवलं की आपण काय त्या तसल्या वाटेला जायचंच नाही.. गेल्या चार पाच वर्षांत माझे पीरीयड्स एकदम रेग्युलर झाले होते. २८ ची सायकल एका दिवसासाठीही मोडली नव्हती. पण नेमकं याच महिन्यांत इतका उशीर!! सुन बैरी बलम सच बोल रे इब्ब क्या होगा!!  

इन फॅक्ट हे नातं दोघांचं नव्हतं, माझं एकटीचंच तर होतं.. मग आता काय? प्रयत्न करूनही मला या प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं. उत्तर माहित नव्हतं असं नाही. ऍबॉर्शन, किंवा त्याच्यासोबत लग्न करणं किंवा एकटीनं कुमारी माता म्हणून जगणं. पर्याय समोर दिसत होते, पण निवडता मात्र येत नव्हते.
ऑफिसमधला दुसरा दिवसही असाच टेन्शनमध्ये गेला. ते होम प्रेग्नन्सी किट मिळाले नाहीतच. एकूणच टेन्शन म्हणा किंवा सायकोलॉजिकल इफेक्ट म्हणा किंवा अजून काही पण संध्याकाळी माझे पाय एकदम दुखायला लागले. गेल्या अनेक वर्षांत असे दुखले नव्हते. मळमळायला पण लागलं. घरी आले, थोडंसं सरबत घेऊन पडून राहिले. अर्ध्या तासात भाडभाड उलटी झाली. डोकं जाम धरलेलं. आता सगळी लक्षणं बरोबर जमून आली. सगळं अंग कचाकचा ओरडत होतं, तरीही पीसीवर धूम अगेनचं गाणं लावलं. तासभर दणादणा नाचून झाल्यावर परत एकदा उलटी झाली. तोपर्यंत पोळीवाल्या काकू आल्या होत्या. त्यांना आफताबपुरत्या पोळ्या लाटायला सांगून, माझ्यासाठी खिचडी करवून घेतली. रात्री साडेआठवाजता एकदाचा लेटमार्क म्हणून का होईना पण रेड मार्क आला. प्रेग्नन्सी वगैरे विचारांनी माझं डोकं इतकं आऊट झालं होतं की मला जबरदस्त ऍसीडीटी झाली आहे हेच मला लक्षात आलं नव्हतं. आणि मग टेन्शनला टेन्शन वाढत जाऊन सगळाच घोळ झाला  होता.

रात्री आफताब आला तेव्हा मी पीसीवर पिक्चर बघत जागत बसले होते. त्याला यातलं काहीही सांगाय्चं नाही हे मी स्वत:शीच ठरवलं होतं. काय खुळाबाई होते. पार ऍबॉर्शन आणि लग्नापर्यंत सर्व विचार करून आले होते. सगळाच चर्खमूपणाचा दरबार.

तरीही तो समोर आल्यावर त्यादिवशी मला रडू आलं. अगदी न ठरवता रडू आलं. त्यानं कारण विचारल्यावर सगळंसगळं सांगितलं. गेल्या दोन दिवसांची तगमग, टेन्शन, माझ्या विचारांची गाडी. सगळंसगळं.
अखेर तो म्हणाला, “स्वप्निल, मला एक फोन करता आला नाही का?”
“तू तिथं दिल्लीमध्ये काय करणार होतास?”
“लगेच निघून आलो असतो. आय नो व्हॉट यु हॅव गॉन थ्रू! इट्स नॉट इझी. यापुढे असं काहीही असेल तर प्लीज माझ्यासोबत लगेच शेअर कर. काही झालं तरी आपण निस्तरून घेऊ”
मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत राहिले. पण दोन गोष्टी क्लीअर झाल्या. यापुढेही हे नातं असंच बिनानावाचं आणि बिनाफ्युचरचं चालू राहील. आणि काहीही झालं तरी आपण निस्तरून घेऊ. निस्तरून. सो नेक्स्ट टाईम जर खरोखर माझे पीरीयड्स प्रेग्नन्सीमुळे लेट झाले तर आपण निस्तरून घेऊ. लग्न करणं वगैरे काही नाही. आपण निस्तरून घेऊ.
अखेर हे नातं केवळ निस्तरायच्याच लायकीचं आहे!
>>>>> 

अर्थात हे इतकं आणि असा कडवटपणा कायमच होता अशातला भाग नाही.  आफताब माझ्यासोबत जवळजवळ दीड वर्षं राहिला. त्याच्या निधीव्यतिरीक्त असलेल्या अफेअर्समधली ही सर्वात जास्त दीर्घकालीन भानगड. सोबत राहिलेल्यानंतर नातं कितीही फिजिकल लेव्हलपुरतंच मर्यादित असलं तरी काहीतरी इमोशनल लोचा होणार. त्यात मी आणि आफताब लव्हर्स होण्याआधी पासून मित्र होतो. तसंपण जर ही केवळ माझी आणि आफताबच्या लव्ह्स्टोरीची गाथा असती तर मी प्रत्येक किस्सानकिस्सा लिहत बसले असते. पण अनफ़ॉर्च्युनेटली ही केवळ लव्हस्टोरी नाहीये. आयुष्य नावाची भानगड कधीच केवळ आणि केवळ लव्हस्टोरी नसते. सो लेट्स गेट बॅक टू माय स्टोरी.
ऑफिसमध्ये एका रिपोर्टसाठी मला बराच ओरडा बसला होता. खरंतर मी माझ्या बाजूनं रिपोर्ट अगदी क्लीअर लिहिला होता, पण माझ्या सीनीअरने त्याच चेंजेस केले आणि तसाच रिपोर्ट पुढे पाठवला. चेंजेस म्हणजे बाबाने ग्रामरसुद्धा चेक केलं नव्हतं. सर्वात जास्त राग आला की, चुका याच्या आणि ओरडा बस्ला मला!
ऑफिसमधून बाहेर पडताना नेहमीसारखा आईला फोन केला. तर तिनं उचलला नाही. घरच्या लॅम्डलाईनवर फोन केला तर नाहीच, मग दुकानामध्ये असेल म्हणून तिथे फोन केला तर तिथे आई बाबा दोघंही नव्हते. बाबांच्या मोबाईलवर फोन केला.
फोनवर कुण्या अनोळखी बाईचा आवाज होता. “कोण हवंय?”
“मी स्वप्निल बोलतेय” फोनवरून त्या बाईने “तुमच्यासाठी फोन आहे” अशी हाक मारली. पलिकडून “कुणाचा आहे गं संध्या?” असं मला स्पष्ट ऐकू आलं, म्हणजे ही फोनवर बोलणारी बाई म्हणजे... माझ्या बाबाची रखैल. आधीच झालेल्या चिडचिडीमध्ये अजूनच चिडचिड, मी फोन बंद करणार होते तेवढ्यात फोनवर बाबाचा आवाज आला.
“काय रे पिल्या?”
“आई कुठाय?” डोळ्यांत येणारं पाणी कसंबसं अडवत मी विचारलं.
“गावामध्ये ते काय नवीन क्लब चालू झालाय ना तिथे गेली असेल. मोबाईलवर फोन करना”
मी फोन कट केला. मला पुढे बोलायचंच नव्हतं. आई घरात नव्हती, दुकानातही नव्हती. आणि बाबा त्या बाईकडे गेलेला होता. घड्याळानं साडेपाचचा काटा गाठायची वाट बघत होते, पण तितका वेळ काढवेना. सरळ बॉसला काहीतरी इमर्जन्सी आल्याचं सांगितलं आणि घरी निघाले.
पण वाईट घटना कधीच सुट्यासुट्या घडत नाहीत. एकसलग घडतात.
स्टेशनवरून रिक्षा करून घरी आले. ट्रेनमधूनच आफताबला दोन तीनदा फोन लावला. त्यानं उचलला नाही. तो आज घरीच होता. दोन दिवसांपूर्वी धावत ट्रेन पकडायला जाताना त्याचा घोटा मुरगळला होता. कालपर्यंत तर चांगला सुजला होता म्हणून घरीच होता. आज सकाळी कार घेऊन ऑफिसला जायचा त्याचा विचार होता, तो मीच हाणून पाडला. “वर्क फॉम होम कर नाहीतर निवांत झोप” अशी सक्त वॉर्निंग देऊन.
बिल्डींगच्या गेटमध्ये आले तर वॉचमनने मला हाक मारली. “मॅडम, तुमचं कूरीअर आलंय”
“माझं? काय कूरीअर?”
“साहेबांच्या नावाने आहे, पण मघाशी कूरीअरवाला आला तेव्हा साहेब म्हणाले की मलाखाली उतरता येणार नाही, म्हणून तो इथेच पॅकेज ठेवून गेलाय” म्हणजे एक तर याची पुस्तकं असणार किंवा ऑफिसची काही कागदपत्रं.
“साहेबांचा पाय दुखतोय, म्हणून ते खाली आले नसतील. कूरीअरवाल्याला तीन जिने चढायला काय धाड भरली होती?”
“ते आता आपण कसं बोल्णार? साहेब म्हणाले की मॅडम वर येताना आणतील. देऊ का?”
वॉचमन ते कूरीअर आणायला लगेच गेला, बहुतेक इथं वॉचमन केबिनमध्ये ठेवण्याऐवजी त्यानं स्वत:च्या खोलीमध्ये सुरक्षित ठेवलं असावं. तो येईपर्यंत मी उगा इकडेतिकडे बघत बसले. समोर व्हीजीटर्स वही पडली होती. सहज त्यावरून नजर फिरवली तर माझ्या फ्लॅट नंबरसमोर एक एंट्री दिसली. दुपारी साडेबारा. एक्झिट साडेचार. नाव होतं. सायली तुषार.
निधीच्या नवर्‍याचं नाव तुषार होतं, आणि त्यानं लग्नानंतर तिचं नाव बदलून सायली ठेवलं होतं.
 (क्रमश:) 

  

Wednesday 15 February 2017

रात के हमसफर


काम संपस्तोवर रात्रीचे दीड दोन वाजलेले असावेत, डोक्यात संगीत कॉफीचा कैफ चढलेला असावा, यारदोस्तांसोबत चिकार खिदळणं झालेलं असावं आणि अशावेळी जग त्याच्या स्वप्नांच्या दुलईमध्ये गुरफटलेला असताना आपण रस्ताभर हिंडत सुटावं. परवा थिबा पॅलेसवरून बाहेर पडल्यावर सरळ घरी येण्याऐवजी दोघंच थिबा पॉइंटकडे गेलो. दूरवर गप्पकन फिरणारा भगवतीचा लाईट हाऊस. क्षितीजाच्या आसपास निवांत पहुडलेला समुद्र, समुद्र आणि खाडीच्या मध्ये पसरलेला भाट्याचा पूल. खाडीमध्ये डोलणार्‍या मच्छिमार बोटी. आणि त्या बोटींच्या अलिकडे झोपलेली रत्नागिरी. कुठलंही शहर त्याचं खरं रूप दाखवतं ते रात्रीच्याच वेळी. दिवसा गाड्या, माणसं, गायीगुरं, किलकिलाट यांनी लपेटलेलं शहर हा सगळा घूंघट उतरवतं ते रात्रीच्या वेळी! एखाद्या शहराच्या प्रेमांत पडायचं असेल तर ते दिवसा केवळ बघावं, पण अनुभवावं ते रात्रीच्या वेळेला. अशावेळी सोबत कुणी असो वा नसो, मनानं मी एकटीच अस्ते. माझ्याच विश्वामध्ये रात्रीच्या या नीरवतेशी माझा संवाद साधत.
रात्रीच्या मुंबईची कैक रूपं आहेत. काही सुरेख चित्रं आहेत तर काही किळसवाणी गिरबिट. मुंबईच्या कुठच्या क्षणी तुम्ही कूठे आहात यावर मुंबई “कशी?” हे ठरतं. रात्रीच्यावेळी मुंबई पहावी ती जुनी मुंबई. ही मुंबई तिथे राहताना अनेकदा अनुभवली. मुंबईच्या रात्रीचा पाऊस अंगचिंब भिजेस्तोवर झेलला, मुंबईच्या रात्रीमध्ये भूक अनावर झाल्यानं सायकलवर चहा विकणार्‍याकडून चहा  घेऊन बिस्कीटं खाल्ली, मुंबईच्या रात्रीमध्ये त्याचा हात हातात इतका घट्ट धरून ठेवला की त्याची लास्ट लोकल चुकली (चुकवलीच !!) आणि मग रात्रभर भटकत राहिलो त्या गल्ल्यांमध्ये.  मुंबईच्या रात्रीने एकटेपणा दिला. साथ दिली आणि मुंबईच्याच रात्रीने आपले अश्रू आपणच कसे पुसावेत हे शिकवल. मी मुंबईला फार मानते ते या बाबतीत. मुंबई तुम्हाला फार फार स्वतंत्र बनवते. या शहरामध्ये कुणाहीवर अवलंबून न राहता तुम्ही जगू शकता! मुंबई रात्रीसुद्धा कधी थांबलेली नस्ते, ती अखंड चालणारी मुंबई जेव्हा आळसावते तेव्हा तिचं रूप अतिशय अनोखं असतं.
मुंबईच्या अगदी उलट माझी दुसरी जीवाभावाची सखी, चेन्नई. सुरूवातीला आले तेव्हा चेन्नई कुठल्याही बाजूने कॉस्मोपोलिटन मेट्रो वाटलीच नाही. नंतर समजलं की चेन्नई मेट्रो नाहीच, आहे ते एक विशाल पसरलेलं खेडं. इथली माणसं त्याच जिव्हाळ्याची आणि मायेची. निवांत जगणं हे इथलं मुख्य सूत्र. मुंबईची धावपळ चेन्नईला मानवणारच नाही. इथे आल्यावर संध्याकाळी साडेसहा वाजता जेव्हा मला लोकलमधला लेडीज डबा अल्मोस्ट रिकामा दिसला (मी आणि अजून तीन पॆसेंजर. अख्ख्या डब्यात) तेव्हा मनापासून घाबरले होते. इतकी रिकामी लोकल बघायची सवयच नाही ना!  चेन्नई जशी फिरायला लागले तशी अधिक आवडली. मुंबईसारखी धकाधकीची नसेल, मुंबईसारखी फॅशन कॉन्शस नसेल, पण चेन्नई आहे मात्र अफलातून. थोडीशी लाजरीबुजरी वाटणारी चेन्नई नंतर नंतर काय दबंग आहे ते समजत गेलं. आता तर सध्या चेन्नई रोजच्या रोज नॅशनल न्युज मध्ये आहे. पण चेन्नईचं सर्वात सुंदर रूपडं कधी असेल तर तेसुद्धा रात्री. चेन्नईला आमच्या ड्रायव्हरचं नाव होतं बाबू. हा बाबू पण मस्त माणूस. फिरायला जायचं म्हटलं की “अम्मा, ये बी देक लो, वो बी टूरीस्ट पॉइण्ट” करत कुठेकुठे फिरवायचा. एकदा तिरूपतीला जायचं ठरलं, दर्शन तिकीट लवकर होतं म्हणून  रात्री दीडवाजता घराबाहेर पडलो. शांत, निवांत चेन्नई अशावेळी अधिकच लाडावलेल्या मांजरीसारखी पहुडलेली होती. चेन्नईच्या त्या रस्त्यावर अचानक त्याला गाडी थांबवायला सांगितली, आणि खाली उतरले. असंच सहज. रात्रीची चेन्नई गुंडुल्या बाळासारखी निवांत दिसत होती. दिवसभर गाड्यांच्या गर्दळीमध्ये रस्ता कधी असा निवांत कधी पाहिलाच नव्हता, त्यादिवशी पाहिला. चेन्नईशी ऋणानुबंधाची अजून एक घट्ट गाठ त्या रात्री मारली.
मी आतापर्यंत राहिलेल्या शहरांमध्ये सर्वात आवडतं शहर आहे मंगलोर. अतिशय सुखसमृद्ध, सुसंस्कृत आणि प्रेमळ शहर. मुंबईने मला एकटं राहून जगायला शिकवलं, तर मंगलोरने मला नवरा बायको मुलगी अशा तिकोणी संसारामध्ये रमायला शिकवलं. मंगलोर सोडलं त्या दिवशी मी खूप रडले, शहर सोडून निघाले त्याहून जास्त जीवाभावाची जमलेले सुहृद सोडून निघाले याचं जास्त रडू आलं होतं. रात्रीचं मंगलोर अनेकदा अनुभव्लं ते रेल्वेस्टेशनवरून घरी येताना. दिवसाभराचा प्रवास करून घरी येत असताना निवांत मंगलोर अजूनच आपलंसं वाटायला लागायचं. या शहराच्या डीएनएमध्येच शांतता आहे. दिवसाही मंगलोर खूप शांत वाटायचं, कितीही गजबजलेला परिसर असू देत, शहर कायम सुकूनमध्ये असायचं. रात्रीच्या वेळी तर ही शांतता अजूनच गडद व्हायची आणि काळोख्या रात्री मंगलोर अमावस्येच्या रात्रीसारखं पिठूळ चांदण्यांचं, पण चंद्राची लकलक  नसलेल्या आभाळासारखं भासायचं.
गेली अनेक वर्षं रात्रीचा कारने प्रवास करणंच सॊडलंय, पण रात्रीचा प्रवास खरा भावतो तो बसमधून. कैक वर्षांपूर्वी  एकदा बसचं तिकीट मिळालं नाही म्हनून पनवेलहून रत्नागिरीला गोवा बसने आले होते. त्याने उपकार करून मला क्लीनरची जागा बसायला दिली. अख्खी रात्र झोपले नाही. कारने काय बसने काय या एन एच १७ र्वरून कैकदा फिरले होते. पण त्या ड्रायव्हरच्या बाजूला बसून इतक्या उंचीवरून दिसणारा तो रस्ता, आणि ती घाटांमधील वळणं अनुभवणं खरंच खास होतं.... हातखंब्याला पहाटे तीन वाजता उतरल्यावर हाच तो तिठा हेच समजेना. रात्रीच्या वेळी कुठलीही जागा किती शांत आणि गूढ दिसते ना.

पण रात्रीच्यावेळी सर्वात गूढ काय दिसत असेल तर तो आपला बेस्ट फ्रेंड –समुद्र. लोकं मावळता सूर्य पाहून झाला की समुद्रकाठावरून घरी जातात. पण खरा चमत्कार सुरू होतो तो सूर्य मावळल्यावरच. कधी तुपामध्ये दिव्याची काजळी घालून काजळ बनवताना पाहिलंय? तसंच त्या दिनकराच्या अनेक रंगांनी नटलेल्या त्या समुद्रावर हळूहळू काजळी पडत राहते आणि तो समुद्र काळ्याशार काजळासारखा रंगत जातो. वार्‍याची दिशा बदलते, भरती ओहोटी बदलते, पण दूरवर क्षितीजाच्या मिठीमध्ये कुठेतरी विसावलेला हा समुद्र दिवसभर मस्ती केलेल्या बाळानं दमून कुठंतरी कोपर्‍यात दोन्ही हात डोक्यावर टाकून झोपल्यासारखा निवांत दिसतो. अपवाद अर्थात पावसाचा. रात्रीचा बेदम पावसाळा समुद्रकिनारीच पहावा. थाडथाडथाड पडणारे ते पावसाचे थेंब, फणा काढून फुत्कारणार्‍या नागासारखा समुद्र आणि तांडवामध्ये शंकराने नेऊन हात फिरवावेत तशा किनार्‍याला येऊन थडकणार्‍या लाटा. आणि या सर्व भयंकर दृश्यासमोर उभी अस्लेली मी एक क्षुल्लक मानवप्राणी. निसर्गाचा कैक लाखो वर्षं चालू असलेल्या या अव्याहत खेळामधला हा छोटासा क्षण. त्या क्षणाची धुंदी अनुभवणारी मी! या अनाहत नादाचा मनावर कुठेतरी गुंगारा बसत जातो. रात्रीचा दिवस होतो, पण मी मनानं कूठंतरी अजून त्याच क्षणामध्ये थोडीशी राहीलेली असते.
मग मी थोडीशी इथेपण असते. एका दूरवरच्या कड्यावरून खाली दिसणारा समुद्र  पहात. हाच समुद्र तो रौद्ररूप धारण करणारा आणि हाच समुद्र त्याची गाज ऐकवत बसलेला. रात्रीची वेळ हळूहळू नसानसांमध्ये चढते. गात्रं थकतात, पण थकत नाही ते मन... ते या निवांत शांत पहुडलेल्या रस्त्यांवरून भरकटतच राहतं. मेंदूच्या स्टेशनमध्ये अचानक रफी येतो आणि शम्मीच्या आवाजामध्ये कानांत हलकेच गुणगुणतो..
रात के हमसफर थक के घर को चले. झूमती आ रही है सुबह प्यार की..