Thursday 5 February 2015

वन पार्ट वूमन

पेरूमल मुरूगन हा लेखक मला माहितच नव्हता. तमिळनाडूच्या कुठ्ल्याशा भागामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये प्राध्यापकाचं काम करणारा हा लेखक. याच्या लेखनाला बरेचसे पुरस्कार वगैरे मिळालेले आहेत. पण तरी मला हा लेखक माहित नव्हता. आता चांगलाच माहित झाला कारण त्यानं एक कादंबरी लिहिली आणि त्या कादंबरीमुळं काही लोकांच्या भावना दुखावल्यात. त्यांनी लेखकाला पुस्तक मागे घेण्याची धमकी दिली आणि म्हणून हताश होऊन या लेखकानं फेसबूकवर “पेरूमल मुरूगन नावाचा लेखक मेलेला आहे” अशी पोस्ट टाकली. या सर्व गोंधळाबद्दल फेसबूकवरच वाचलं त्यानंतर तीन की चार दिवसांनी झालेल्या हिंदू लिटरेचर फेस्टिवलमध्ये यासंदर्भात बरीचशी चर्चा झाली. मूळ तमिळ “मदुरोबगन” (बरोबर लिहिलाय का शब्द?) वाचणं शक्य नसल्यानं “वन पार्ट वूमन” हे त्याचं इंग्रजी भाषांतर घेतलं. पुस्तक वाचल्यानंतर अद्यापही मला वादविवादाचं नक्की कारण काय आहे ते समजलेलं नाही.

सत्तर- पंचाहत्तर वर्षापूर्वी कोंगूनाडू या भागामधल्या एका छोट्याशा खेड्यामध्ये घडणारी ही कथा. काली या एका गौंडर समाजामधल्या शेतकर्‍याची आणि त्याच्या पोन्ना या बायकोची ही कथा. काली आणि पोन्नाच्या बारा वर्षांच्या संसारामध्ये एक अपत्यसुख सोडल्यास सगळं काही आहे. मूल नसल्यानं एकूणच दांपत्यजीवनावर होणारा परिणाम, नातेवाईकांचं टक्केटोणपे, तिला गावामध्ये “वांझ” म्हणणं किंवा त्याला नपुंसक म्हनून होणारी हेटाळणी हा या कथेचा मुख्य गाभा. या जोडगोळीकडे पैसा आहे, जमीन आहे. कशाचीच कमतरता नसल्यानं मूल होण्यासाठी त्यांनी तर्‍हेतर्‍हेचे नवस बोलले आहेत, कित्येक पूजाविधी केले आहेत. आपल्या पूर्वजांच्या चुकांचं प्रायश्चित घेतलेलं आहे. इतकं सर्व करूनही पोन्नाची कूस उजवतच नाही. काली आणि पोन्नाचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, आपल्या जोडीदारामध्ये कमतरता आहे की नाही याचा जरादेखील विचार न करता निस्सीम प्रेम करणारं हे जोडपं – ही झाली काल्पनिक कथा.

हे जोडपं ज्या भागात राहतं त्या भागाजवळ तिरूचनगोडे या गावात एक मोठं आणि जुनं उंच टेकडीवरचं देऊळ आहे. सुमारे दोन हजार वर्षापूर्वीच्या या देवळाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं शंकर अर्धनारीश्वराच्या रूपामध्ये आहे. अर्धा भाग पार्वती आणि अर्धा भाग शंकर. (म्हणून या देवाचं नाव वन पार्ट वूमन!) या देवाची दरवर्षी वैशाख महिन्यामध्ये प्रचंड मोठी जत्रा भरते. पंधरा दिवस चालणाया या उत्सवामध्ये असं मानलं जातं की या काळामध्ये देव टेकडीवरून उतरून खाली आलेले असतात, पंधरा दिवस उत्सवामध्ये देवांची मिरवणूक आणि वेगवेगळे विधी केले जातात. पंधराव्या दिवशी देव टेकडीवर परत निघून जातात. – हा इतका झाला सत्यभाग. तिरूचनगोडेच्या या अर्धनारीश्वराची  जत्रा आजही भरते.
पूर्वी म्हणजे कथा ज्या काळात घडते त्या काळात अशी पद्धत होती म्हणे की, या उत्सवाच्या चौदाव्या रात्री इथल्या सर्व पुरूषांच्या अंगामध्ये देवाचा अंश असतो परिणामी, त्या रात्री त्यानं कुठल्याही स्त्रीसोबत संभोग केल्यास तो “देवाचा प्रसाद” असतो. अनेक मूल नसलेल्या स्त्रिया या रात्री या भागामध्ये येऊन देवाकडून असा प्रसाद घेत असत. पोन्नाची आई तिला या जत्रेमध्ये कालीच्या नकळत घेऊन जाते. पोन्नाला हे मनापासून मान्य नाही, पण मुलासाठी काय वाट्टेल ते दिव्य करायची तिची तयारी आहे. याआधी तिनं जीवावर बेतू शकतील असे नवस केले आहेत. त्यामानानं हे काहीच नाही. कालीला यापूर्वी जेव्हा यासंदर्भात विचारलं होतं तेव्हा त्यानं या गोष्टीला साफ नकार दिलेला. आता त्याच्या नकळत पोन्ना यात्रेला गेली आहे. आता वास्तवामध्ये ही पद्धत अर्थातच अस्तित्वात नाही. वादाचा मुद्दा हा आहे की समाजाच्या एका सेक्शनचं असं म्हणणं आहे की अशी पद्धत त्याही काळात नव्हतीच. या लेखकाच्या मनाच्या कहाण्या आहेत आणि त्यामुळे आमच्या स्त्रियांचा अपमान होतोय. वास्तविक शंभर वर्षापूर्वी अशी पद्धत होती की नाही ते शोधून काढ्णं फारसं कठिण काम नसावं, पण इथं सत्याची कुणाला काय पडली आहे. तूर्तास, या वरून भावना दुखावून जाळपोळ करणे जास्त सोपं नाही का?
मला वैयक्तिकरीत्या हे पुस्तक भावलं. एका जोडप्याच्या मनामधल्या भावना कसल्याही अतिरंजितपणाचा आधार न घेता, साधंपणानं मांडणं हे खूप उत्तमरीत्या जमलेलं आहे. इंग्रजी भाषांतर वाचत असल्यामुळे स्थानिक भाषेचा फ्लेवर अर्थातच येत नाही. तरीदेखील त्या समाजाच्या, स्थानिक लोकांच्या श्रद्धा-अंधश्रद्धा, दैनंदिन वागणुकीमधले छोटे छोटे तपशील फार खुबीनं मांडलेले आहेत. काली आणि पोन्नाची व्यक्तीमत्त्वं फार वेगळी आहेत. नवर्‍यासोबत आनंदानं रममाण होणारी तरीदेखील मूल नाही म्हणून कुढणारी, त्यावरून कुणी काही बोललं की लगेच ताडकन उत्तर देऊन मोकळी होणारी ही पोन्ना. झाडामाडांत खुश राहणारा, मोकळी जागा दिसली की झाडं लावणारा, शेतकरी मनाचा काली. मूल नाही म्हणून बायकोचा त्याला राग नाही. दुसरं लग्न करायची इच्छा नाही. बायकोवर मनापासून प्रेम करणारा नवरा. त्याची आई आणि सासू जेव्हा या जत्रेचा विषय काढतात तेव्हा त्याला ते अजिबात आवडत नाही. एक वेळ मूल नसलं तरी चालेल, पण असं काही करायचं नाही असा त्याचा साधासरळ हिशोब. तसं मूल झालंच नाही तर दोघांचंही काही बिघडत नाही. दोघं एकमेकांना व्यवस्थित कंपॅटीबल आहेत. पण कुठल्याही टीपिकल खेड्याप्रमाणं यांच्या वांझपणाचा त्रास इतरांना होत असल्यासारखं समाज दोघांच्या मध्येमध्ये करत राहतो. या दोघांना मूल नाही याचा जरादेखील विसर न पडू दिल्यासारखं इतरांना कायम यासंदर्भामध्ये बोलायचं असतं... जणू प्रेम करायचं ते लग्नासाठी आणि लग्न करायचं ते मुलासाठी. बरं, हे मूल तरी कशाला हवं तर म्हातारपणी सांभाळायला, इस्टेट सांभाळायला आणि मेल्यावर जाळायला!

काली आणि पोन्ना या दोघांचीच ही कथा नाही. एका मूल नसलेल्या जोडप्याकडं बघायचा अख्ख्या समाजाचा दृष्टीकोन कसा आहे याची  ही कथा आहे. गावामधला, घरामधला प्रत्येक माणूस या दोघांना “मूल होण्यासाठी” काहीनाकाही सूचना करत असताना दिसतो. कुणाला कालीसाठी दुसरी बायको सुचवायची आहे, कोण पोन्नाला अमक्या देवळाच्या प्रदक्षिणा करायचा नवस कर असं सुचवायचं आहे. पोन्ना तिच्याकडून शक्य होईल तितकं करतेच आहे. कालीनं दुसरं ल्ग्न केलं तर आपली काय अवस्था होइल याची असार्थ भिती तिला आहे. तिरूचनगोडेच्या त्या जत्रेमध्ये गेल्यावर तिच्या मनामध्ये केवळ एक हेतू आहे. मानवाच्या रूपामध्ये येऊन देव मला बाळाचं वरदान देईल. या कथेचे दोन शेवट आहेत. दोन्ही  शेवटानुसार लेखकाने त्याचे सीक्वेल लिहिले आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या कंट्रोवर्सीनंतर या पुस्तकांचं इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध होण्याचं रद्द झालेलं आहे.

आता परत वादावादीचा विषय. लेखकानं  लिहिलेली ही प्रथा हा या कादंबरीचा विषय नाही. मूल नसलेल्या जोडप्यामध्ये नवर्‍यानं दुसरी बायको करून आणणं हे आजही समाजामधलं वास्तव आहे. तसंच, बायकोनं दुसर्‍या पुरूषाकडून गर्भधारणा करवून घेणं हेदेखील याच समाजामधलं वास्तव आहे. अख्खं महाभारत घडलंय त्यामुळं. एखादी काळाच्या पडद्याआड गेलेली प्रथेसंदर्भात लिहिलं तर त्यामुळे आज “स्त्रियांचा अपमान” नक्की कसा होतो हे मला न सुटलेलं कोडं आहे. प्रत्येक लेखकाला लेखनस्वातंत्र्य असलंच पाहिजे, त्याहूनही जास्त समाजाचा “टॊलरन्स लेव्हल” जास्त असला पाहिजे. अशा कश्या एवढ्यश्या गोष्टीमुळं भावना दुखावतात? त्या भावना आहे की गळू? जरा काही झालं की दुखून ठणका मारायला?

हे केवळ याच लेखकासंदर्भात अस्तं ना तर इतका काथ्याकूट केला नसता, पण हे आज प्रत्येकच बाबतीत घडतान दिसतंय. तमिळनाडूचं जाऊ द्या, आपल्या महाराष्ट्रात काय स्थिती आहे?
संस्कृती म्हणजे काय देव्हार्‍यामधलीनटवून सजवून ठेवलेली मूर्ती नव्हे, संस्कृती ही एक जिवंत एंटीटी आहे. तिला अस्तित्व आहे, इतिहास आहे, वर्त्मान आहे आणि भविष्यदेखील असेल. प्रश्न उद्भवतात जेव्हा तुम्ही आजच्या वर्तमानावरून तिचं उद्याचं भविष्य बनवण्यासाठी इतिहासामध्ये फेरफार करता तेव्हा. आपल्याकडे ठराविक गोष्टी इतिहासामध्ये होत्या, त्यात लाज वाटण्यासारखं किंवा भावना दुखवून घेण्यासारखं काहीही नाही. त्या प्रथा, पद्धती त्यात्या काळाचं  प्रॉडक्ट होत्या, काळ बदलला तशा प्रथा बदलल्या. आजच्या वर्तमानाचं फ़ूटपट्टी लावून त्या प्रथांचं मोजमाप केल्यानं नक्की काय साध्य होतं ते मला अद्याप समजलेलं नाही.

पण इथं माझ्या समजण्या न समजण्याला किंमत आहे कुठं? हा तर खेळ केवळ दुकानबाजीचा.

आपल्यासारखा दांभिक समाज जगात कुठं  आहे का हो? दांभिकपणाचा आपला इंडेक्स फारच “हाय” असणार. आपल्या “भावना” कशानंही दुखावतात. कशानंही. आपला अपमान कुठल्याही कारणानं होतो.  कुठल्याही. आपल्याला रस्त्यावर उतरायला कसलंही टिनपट कारण पुरतं. कसलंही.

कारण आपल्याच भावना पोकळ होत चालल्यात. सडत चालल्यात.