Tuesday 20 October 2015

शोध: एक जबरदस्त अनुभव

कधी कधी काही पुस्तकं लोणच्यासारखी असतात, ही पुस्तकं सावकाश निवांत बैठक लावून वगैरे वाचली जातात. काही काही पुस्तकं मात्र अधाश्यासारखी आता पुढे काय झालं करत धडाधड संपवावी लागतात. रहस्याचे असे बेमालूम गुंते करत जाणं आणि ते अलगद सोडवत जाणं हे फारच कौशल्याचं काम. थ्रिलर्स लिहिणारे म्हणूनच मला कमालीच्या आदराला पात्र वगैरे वाटतात. इंग्रजीमध्ये थ्रिलर हा एक भलामोठा जॉनर आहे त्यात परत अजून काय वेगवेगळे सब जॉनर आहेत. मराठीमध्ये फार कमी वेळा थ्रिलर कादंबर्‍या वाचायला मिळतात आणि त्याही बहुतेकदा “हूडनिट” या टाईपमधल्या असतात. हिस्टॉरिकल थ्रिलर हा प्रकार आपल्याकडं अतिशय कमी पहायला मिळतो. त्याचं मुख्य कारण म्हणजे जेव्हा कधी आपल्याला इतिहासाबद्दल लिहायचं असतं तेव्हा काळ्यापांढर्‍या- नायक खलनायक या स्वरूपांतच लिहावं लागतं. तुम्ही यामध्ये करड्या रंगांची व्यक्तीमत्वं (डोंबल! हल्लीतर तुम्ही “भावना दुखावणारा” एकही शब्द वापरू शकत नाही!!!) रंगवणं अलाऊड नाही. मग उरतं काय तर “ते झर्र्कन वळाले, त्यांनी गर्रकन नजर वळवली. इत्यादि इत्यादि) पण या इतिहासाचा वर्तमानाशी सांगड घालून केलेलं लिखाण फार थोडंच आहे. शिवाय ऐतिहासिक लिखाण म्हणजे ठराविक व्यक्तीरेखांचा केलेला उदोउदो, इतर “साईड कॅरेक्टर्स”ना त्यात स्थानच नाही. अशावेळी आपल्याकडे इतका प्रचंड मोठा इतिहास असताना ऐतिहासिक थ्रिलर्स मात्र फार थोडीच आहेत. (जवळजवळ नाहीतच) अंताजीची बखर सारखे थोडे वेगळे प्रयोग सोडल्यांस इतरत्र सर्व आनंदच (टॅंजंट मारून: सध्या हिस्टॉरिकल फिक्शनचा एक वेगळाच अवतार सर्वत्र पहावयास मिळतो आहे. दुर्दैवाने त्या “फिक्शन”लाच “सत्य” मानायचे ही जबरदस्तीदेखील त्याच्यासोबत असतेच!! हे तथाकथित इतिहासाचे पुनर्लेखन करणारे लोकं कादंबर्‍या का लिहत नाहीत?? सुरस चमत्कारिक कहाण्या तशाही रोज प्रसवत असतातच!! असो, टॅंजंट समाप्त)

आता एवढा सगळा उहापोह करण्याचं कारण आहे मुरलीधर खैरनारांची “शोध” ही कादंबरी. माझी आणि खैरनारांची ओळख फेसबूकावर झाली. तेव्हा ते शोध : काही नोंदी या फेसबूक पेजवर शोधबद्दल काही माहिती टिपणं लिहत होते. मला ती कल्पनाच फार इंटरेस्टिंग वाटली. या नोंदी वाचतानाच कादंबरीचा आवाका आणि त्यामध्ये अचूकता येण्यासाठी केलेली तयारी आणि अभ्यास कुतूहल वाढवणारे ठरले. त्यादरम्यान मीही माझी पहिली कादंबरी लिहतच होते, मार्गदर्शनासाठी- खास करून काही कॅरेक्टर्सच्या संदर्भामध्ये मी तेव्हा खैरनारांबरोबर चर्चा देखील केली होती. त्याचवेळी त्यांची कादंबरी वाचायचीच हे ठरवलं होतं.

कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर ऑर्डर करून मागवेपर्यंत बरेच दिवस गेले, पण एकदा हातात कादंबरी आल्यावर मात्र सलग बसून वाचून काढली. एक वेगळाच जबरदस्त अनुभव म्हणता येईल अशी ही कादंबरी आहे. कादंबरीमध्ये रहस्य आहे, थरारक पाठलाग आहेत, प्रणय आहे, एकमेकांचे केलेले विश्वास्घात आहेत, वेषांतरे आहेत, हीरो आहे, व्हिलन आहे आणि आदिवासी आहेत. एका उत्तम मसाला करमणुकीसाठी लागणारे सर्वच घट्क यामध्ये आहेत. ही भट्टी अशी मस्त अफलातून जमून आली आहे की, कादंबरी एकदम खुसखुशीत झाली आहे.


कादंबरीच्या रहस्याची सुरूवात होते ती सुरतेच्या लूटीपासून. शिवाजीराजांनी सुरत लुटल्यानंतर आणलेला भलामोठा खजिना कुठंतरी दडवून ठेवला गेला या ऐतिहासिक गोष्टीतून ही कथा पुढे सरकते. हा खजिना शोधण्यासाठी अनेक जण झटत आहेत. प्रत्येकाचे त्यामागचे हेतू पूर्णपणे भिन्न आहेत. मात्र, गेली कित्येक शतकं हा खजिना कुठं आहे याची कुणाला माहिती नाही. कथानकाची चाकं फिरू लागतात ती एका ब्रिटीश तरूणीच्या हाती मिळालेल्या पत्रामधून. हे पत्र खजिन्याबद्दलचा सुगावा सांगतं आणि मग सुरूवात होते ती एका विलक्षण थरारक पाठलागाला. यामध्ये राजकारणी धेंडं आहेत, उद्योगपती आहेत, पोलिस यंत्रणा आहे, मारेकरी आहे आणि दोन अगदीच सामान्य असे तरूण तरूणी आहेत. मुंबई-पुणे-नाशिक या भागांमध्ये घडत जाणारी ही कथा आपल्याला अनेक प्रसिद्ध आणि अनवट अशा दोन्ही ठिकाणी घेऊन जाते, एशियाटिकसारखी जुनीपुराणं वाचनालय किंवा आदिवासींसाठी पूज्य असणारे गौळ अशा अनेक ठिकाणांमध्ये हे कथानक वेगानं फिरत राहतं. शेवटी रहस्य उलगडलंय असं वाटत असतानाच वाचक पुन्हा एकदा वेगळ्याच रहस्याच्या भोवर्‍यामध्ये अडकतो. याहून जास्त कथानकाबद्दल काही सांग्ण्य़ात अर्थ नाही, कारण ती प्रत्यक्ष वाचण्याची गोष्ट आहे.
कादंबरीवर डॅन ब्राऊनचा ठसा स्पष्टच आहे, डॅनच्या कादंबर्‍यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्याजवळ असलेली हजारो वर्षांच्या गुपितांची कन्स्पिरसी थेअरीज. होली ग्रेल असो वा मेसन्स असो या सर्वांना त्या भागामध्ये प्रचंड लेखन होऊनदेखील त्यांचं खरं स्वरूप आजवर सामोरं आलेलं नाही. परदेशांमध्ये अशा गुप्त संघटना केवळ कपोलकल्पित नाहीत, तर प्रत्यक्षामध्ये आहेत. भारतात  मात्र, अशा संघटना बहुतेक नाहीतच (इथं दोन पिढ्यापूर्वींच्या इतिहासबद्दल गुद्दागुद्दी चालते, तर हजारो वर्षांच्या इतिहासाचं काय घेऊन बसलोय!) त्यामुळे खैरनारांना हे सर्वच काही “निर्माण” करावं लागलं आहे. त्यापैकी शिवाजी महाराजांनी सुरतेहून लुटून आणलेला खजिना लपवून ठेवला या दंतकथेला सेंटर प्लॉट करून त्यांनी इतर सर्व डोलारा उभारलेला आहे.


मला व्यक्तीश: कादंबरीचा प्लॉट फार् आवडला तरीही अशा प्रकारच्या कादंबर्‍यांमधल्या रहस्याचा जो मूळ कणा असतो तो सुगावे अथवा क्लू शोधत जाणं तो भाग  मला किंचित सरधोपट वाटला. नकाशाचे क्लूज फार पटापट सुटतात किंवा इतर टेक्निकल वर्णनांमध्ये तो भाग डोक्याला फारश्या झिणझिण्या आणत नाही. बर्‍याचदा कादंबरीच्या बारीकसारीक डीटेलिंगमध्ये तो भाग थोडासा वेगळा पडत जातो आणि काय घडतंय याच्या फ्लोम्ध्ये हे क्लूज थोडेसे हरवल्यासारखे वाटतात.


कादंबरीमधला सर्वात सशक्त भाग आहे तो म्हणजे व्यक्तीरेखा. केतकी आणि शौनक या दोन व्यक्तीरेखा अधिकच ठळकपणे उभ्या राहिलेल्या आहेत. पैकी, केतकी ही स्त्री व्यक्तीरेखा खूपच ताकदीनं आणि ठळकपणे सामोरी येते. या व्यक्तीरेखेचे सर्वच पैलू फार सुंदररीत्या रेखाटलेले आहेत. तिचा चाणाक्षपणा, धोरणीपणा, तिची नितीमूल्यं आणि तिचा ध्यास या सर्वांमूळे ही व्यक्तीरेखा फार आव्हानात्मक बनली आहे. तिच्या मानानं शौनक ही व्यक्तीरेखा थोडी खुजी वाटली तरी त्याला स्वत:चा वेगळा अवकाश आहे. शौनक पूर्ण वेळ केतकीबरोबर असला तरी त्याची धोरणं वेगळी आहेत. या खेळामध्ये केतकी आणि शौनक अथातच रोमॅण्टिकली इन्वॉल्व होतात, पण ते इन्वॉल्व होणं दोघांच्याही दृष्टीनं फारसं महत्त्वाचं नाही, इतक्या वेगानं कथानक पुढे सरकत राहतं. वाचकाला जरासुद्धा उसंत घ्यायला मिळू नये अशा तुफान स्पीडनं कथानक पुढे धावत राहतं, हे या कादंबरीचं अजून एक वैशिष्ट्य, स्थलकालाची प्रत्यक्षाबरहुकूम वर्णनं आणि तरीही वेळेकाळेचं भान ठेवत चाललेला पाठलाग ही कसरत सांभाळणं सोपं नाहीच, खैरनारांना ते सहजपणे जमलंय.

कादंबरी वाचून जॅक्सन या ब्रिटीश ऑफिसरबद्दल खरंच खूप वेगळी आणि डोळे उघडणारी माहिती मिळाली. पुन्हा एकदा, एखाद्या व्यक्तीला खलनायक म्हणून रंगवताना त्याचे इतर पैलू कसे डोळे झाकून दुर्लक्षित केले जतात ते आठवलं.
शोध ही कादंबरीचं अजून एक खास गंमत म्हणजे ती तिच्या जॉनरशी पूर्णपणे प्रामाणिक राहते. उगाच नंतर घालायचे म्हणून जीवनविषयक तत्त्वज्ञानाचे फंडे (कित्येक मराठी लेखकांच्या कसल्याही कादंबर्‍या या असल्या सुविचाररूपी चांदण्यांनी चमकचमक् चमकतात) शोध मात्र, केवळ आणि केवळ थ्रिलर इतक्याच परीघाभोवती फिरते आणि तिथेच ती यशस्वी होते.


कादंबरी वाचताना काही गोष्टी मात्रफार खटकल्या. पहिलं म्हणजे मुद्रित शोधनामधल्या चुका. या चुका काही ठिकाणी फार प्रकर्षानं जाणवतात, आणि त्या सहज् टाळता येणार्‍या आहेत. पुढील आवृत्तीमध्ये या चुका निश्चितपणे काढून टाकता येतील. दुसरी एक गोष्ट म्हणजे अधेमध्ये येणारी हेलीकॉप्टरची वगैरे टेक्निकल वर्णनं, यांचा मूळ कादंबरीच्या विषयाशी फारसा संबंध नाही आणि एकंदरीत कादंबरीला ती खूप पसरट बनवत जातात.


माझ्या मते तरी सर्वात उत्तम जमलेला भाग म्हणजे केतकी आणि शौनक दोघंही आदिवासीपाड्यावर पोचतात तिथून पुढला भाग. इथून कादंबरी पूर्णपणे वेगळं वळण घेते. कोकणा आदिवासांच्या समजुती, त्यांच्या पद्धती आणि त्यांचे आचार विचार वाचताना आपण पूर्णपणे वेगळ्याच जगात पोचतो. आपल्याच आजूबाजूला असणार्‍या या आदिवासींची संस्कृती त्यांच्या पूजाअर्चनेच्या पद्धती आपल्याला नीट ठाऊक नसतात खरंतर. या आदिवासींच एकवीसाव्या शतकामध्ये जगतानादेखील जपलेल्या हजारो वर्षांच्या संकल्पना यांची सांगड फार सहजरीत्या घातली आहे. हा भाग वाचताना नकळत आपणदेखील त्या आदिवासी पाड्यामध्ये जाऊन पोचतोच.


प्रत्येक मराठी वाचकानं “मराठी पुस्तकं का खपत नाही” वगैरे आरडाओरडा बंद करून आणि साठ सत्तरच्या दशकांमधल्या क्लासिक पुस्तकांबद्दल स्तुतीपर काव्यं लिहिणं थोडं कमी करून आजच्या काळाशी सुसंगत आणि एक चांगला प्रयोग म्हणून शोध ही कादंबरी वाचायला हवी. मी स्वत: तरी ही कादंबरी सलग वाचून काढली, इतकी या उत्सुकत्ता या कादंबरीनं नक्कीच निर्माण केली आहे. उत्तम कथा मिळत नाहीत (अथवा सुचत नाहीत) म्हणून अद्यापही त्याच त्यात कथा रीसायकल करणार्‍या मराठी चित्रपट निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी शोधचा विचारदेखील करायला हरकत नाही (अर्थात त्यासाठी त्या ताकदीची टीम हवीच हवी)



 (end) 


Monday 12 October 2015

MAD-रास ३

 हे साधारण कुठल्याही नवीन शहरामध्ये गेल्यानंतर होणारेच हाल आहेत. त्यात शहर स्पेसिफ़िक असं काहीच नाही. पण चेन्नईचे खास असे काही वेगळेच प्रॉब्लेम्स आहेत त्यापैकी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इथला उन्हाळा (खरंतर इथं दुसरा ऋतू नाहीच तरीही मे महिना सर्वात कठीण) आणि दुसरं म्हणजे प्यायचं पाणी. चेन्नईचं पाणी हे खारं पाणी आहे. इथे तसेही पाण्याचे स्त्रोत फार कमी आहेत. बघायला गेलंतर शहरामधून तीन नद्या वाहतात पण त्यांची अवस्था भलीमोठी गटारं अशीच आहे. परिणामी पाण्यासाठी असलेले तीन मोठे तलाव आणि बोरवेल यावरच मुख्य भिस्त आहे. लहरी पावसामुळे पाण्याची टंचाई आधीपासूनच होती.




त्यातही गेल्या दशकामध्ये पाण्याची इथं अतिप्रचंड टंचाई जाणवली होती. जवळ्जवळ दोनशे किमीवरून पाणी वाहून आणावं लागत होतं. त्यानंतर शहरातला पहिला डीसलायनेशन वॉटर प्लाण्ट चालू केला. हा प्लाण्ट आम्ही राहत असलेल्या गावापासून अवघ्या दहा किमीवर मिंजूर इथं आहे. शहराकडे जाणारा पाण्याचा साठा आमच्याच गावावरून जात असल्याने आम्हाला पाण्याची टंचाई कधीही जाणवत नाही. अगदी उन्हाळ्यांतसुद्धा पाणीकपात होत नाही. अर्थात पाणी भरपूर असलं तरी त्याचे स्वत:चे नखरे असे वेगळेच आहेत. हार्ड वॉटर म्हणता येईल असल्या क्वालिटीचं पाणी, त्याला अजिबात चव नाही आणि प्यायचं पाणी म्हणून सुरक्षित अजिबात नाही.



चेन्नईमध्ये नळाला येणारं पाणी हे पिण्यालायक नसतं ही माहिती आम्हाला आधीच मिळाली होती. त्यावर उपाय म्हणून तथाकथित बिसलेरीची कॅन विकत घ्यायचे हेही सांगितलं होतं. पंचवीस रूपयाला पाच लिटरचा कॅन.  हा काही मिनरल वॉटरचा कॅन नव्हेच. खारं पाणी गोडं करून विकतात, पण हे पाणी जंतुविरहीत वगैरे अजिबात नसतं. आम्हाला त्याची सत्यता फारच मनापासून नंतर पटली. इथे येऊन पंधरा-वीस दिवस झाले होते. सतिशच्या नोकरीची घडी बसत चालली होती. सुनीधीसाठी मी नर्सरी अथवा प्रीकेजी टाईप एखादं स्कूल शोधत होते. भाषेचा लढा चालूच होता. तर इतक्या सर्व गडबडींमध्ये तापाचं दुखणं निघालं. पहिला एक दिवस क्रोसीनवर घालवला. दुसर्‍या दिवशी मात्र प्रचंड अंगदुखी आणि ताप. सकाळी झोपेतून जागेच होता येईना इतका थकवा. सेम अवस्था नवर्‍याची सुद्धा. नवीन नोकरीमध्येच फार सुट्ट्या नकोत म्हणून तो कसाबसा कामावर गेला. मी मात्र अख्खा दिवस झोपूनच. जेमतेम घरातली काही कामं केली, स्वयंपाक म्हणायला काय खिचडीभात केला. 

सगळं अंग गळून गेलं होतं. संध्याकाळी तो घरी आला तोसुद्धा तापानं फणफणलेला. शेजारणीला हाक मारून सांगितलं की आम्हाला डॉक्टरकडे जायचं आहे. कुणाकडे जाऊ? तिनं बाजारामध्ये असलेल्या एका डॉक्टरचा पत्ता सांगितला. मी आणि सतिश दोघंही तोपर्यंत अक्षरश: झोकांड्या जावेत इतके तापाने फणफणलेले होतो. चालत कसेबसे डॉक्टरच्या दवाखान्यापर्यंत गेलो, तिथं रीसेप्शन काऊंटवर एक अत्यंत अजागळ, घाणेरडी आणि उर्मट बाई बसली होती. वय साधारण पन्नाशीच्या पुढ्चं. आम्ही दोघं तिला सांगत होतो की खूप ताप आहे, बस्ण्याची सुद्धा ताकद नाहीये वगैरे. ती वस्सकन तमिळमध्ये आमच्यावर ओरडली. काय ओरडली ते शब्दश: समजलं नाही तरी टोकन घ्या आणी गप्प बसा, नंबर आला की आत सोडू हे असावं. अजून  वीसेक नंबर शिल्लक होते. शेजारी उभा असलेला पेशंट म्हणाला “और एक घंटा लगेंगा”. मला पाच मिनीटं उभं रहावत नव्हतं. जमलं तर लवकर नंबर लाव नाहीतर आम्ही घरी जातो, तासाभरानं परत येऊ तेव्हा लगेच नंबर दे असं त्या रीसेप्शनिस्टला सांगायचा प्रयत्न केल्यावर ती परत एकदा डबल वस्सकन ओरडली. तेही इतक्या जोरात की अर्धा दवाखाना आमच्याकडे वळून बघायला लागला.



दवाखान्यात लोकं गंमत म्हणून येत नाहीत काहीतरी त्रास होत असतो म्हणून आलेले असतात, त्यातही जर उशीर होत असेल तर नंतरचा नंबर देणं अथवा उशीरा यायला सांगणं हे त्या रिसेप्शनिस्टच्या कामामध्ये येत नाही का? त्याक्षणी बाहेर बसलेल्या पेशंटवर नजर टाकली तर बहुतेक पेशंट हे गरीब, मजूर आणि अशिक्षित असे दिसले. जर ही बया आमच्यासारख्या सुशिक्षित दिसणार्‍या लोकांसोबत बोलताना इतक्या घाणेरड्या टोनमध्ये बोलत असेल तर या बिचार्‍या पेशंटशी कशी बोलत असेल... काही पेशंट्स जमीनीवर बसले होते, त्यांना मुद्दाम तिथं बसायला सांगितलं होतं.. का ते कारण सांगायची गरज आहे का? एकंदरीत वातावरण खूप वाईट होतं.


मी, नवरा दोघंही तापानं आजारी होतो... तेव्हा बोलवागायचं सौजन्य तरी किमान दाखवणं इतकी चूक असते का? अगदी चकचकीत मेकप केलेली रीसेप्शनिस्ट नको. पण किमान स्वच्छ साडीनेसलेली, केस विंचरलेली आणी तोंडात पानपरागचा तोबरा भरलेली तरी नकोच. हे सर्व बघून नवरा मला म्हणाला, चल इथून. परत या दवाखान्यात यायला नको.


मघाशी ज्या शेजारणीला डॉक्टरणीचा पत्ता विचारला ती आमच्या पाठोपाठ दवाखान्यात आली, आम्ही व्यवस्थित पोचलो की नाही बघायला!!! आमची अवस्था बघून आणि इतकी गर्दी बघून ती म्हणाली की इथं एक नवीन दुसरी डॉक्टर आली आहे तिच्याकडे जाऊया का?



ही दुसरी डॉक्टरीण बाई अगदी नुकती महिन्याभरापूर्वी आली होती म्हणे. तिच्याकडे काहीही गर्दी नव्हती. तिनं तपासलं आणि एक दोन औषधं लिहून दिली. इंजेक्शन तर दिलंच. घरी आलो आणि जे काय होतं ते खाऊन झोपलो. रात्रीतून सुनिधीलादेखील ताप भरला. दुसर्‍या दिवशी नवरा ऑफिसला जाण्याच्या स्थितीमध्येच नव्हता. परत डॉक्टरीण बाईकडे गेलो. म्हणाली बहुतेक कावीळ आहे, ब्लड टेस्ट करावी लागेल. एका अतिशय जुनाट  लॅबचा पत्ता दिला. (लॅब इतकी जुनाट होती की तिथे त्या माणसानं ब्लड रीपोर्ट टाईपरायटवर टाईप केला. टाईपरायटर!! आठवला का? कीबोर्डसारखाच दिसतो पण जरा मॊठा असतो!! त्याच्यावर!!) कावीळ नव्हती. पण डॉक्टरीण बाई म्हणे, गडबड आहे आपण लगेच परत ब्लड टेस्ट करू. त्याच लॅबमध्ये. हे काय गौडबंगाल आहे कळेना. गेले तीन दिवस ताप जराही कमी झाला नव्हता. अंग दुखत होतं भरीसभर उलट्या चालू होत्याच. सुनिधीला ताप आला होता म्हणून बाईला म्हटलं पेडीयाट्रीशीअन रेकमेंड कर. तर म्हणे, मीच औषधं लिहून देते. कशाला हवा पेडीयाट्रीशीअन?


मला आता एकंदरीत डॉक्टरीण बाई बोगस वाटू लागली होती. त्याच दिवशी कामवालीने बॉम्ब टाकला, तुमच्याकडे काम करायला जमणार नाही. माझे पैसे द्या, मी उद्यापासून येणार नाही. हे राम!! ऊठाले रे बावा!! म्हणायची वेळ आली.


संध्याकाळी परत त्याच डॉक्टरकडे गेले तर म्हणे, तुला खूप अशक्तपणा आलाय, सलाईन लावते. म्हटलं आधी ताप तर उतरूदेत. त्यासाठी औषधं दे. तर म्हणे आता परत ब्लड टेस्ट करू. मगच औषधं देऊ.


आजारपणामुळे आमच्या दोघांचं विचार करण्याचं यंत्रच बंद झाल्यासरखं वाटत होतं. तरीही ओळखीच्या दोन डॉक्टरांना शेवटी फोन केला. ते म्हणाले असे बारा बारा तासांनी रक्त तपासायची गरज नाही. दुसरा डॉक्टर बघा. आम्हाला काहीही समजेना. बाईला एकूणातच निदान होत नाहीय हे लक्षात आलं होतं. दिवसाभरात या डॉक्टरकडे चार चकरा मारल्या होत्या. या वाटेवर जिथे आमची गल्ली संपत होती तिथे एक भलामोठा बंगला होता. त्याच्या गेटवर नावांच्या दोन पाट्या होत्या. एक ऍडव्होकेटची आणि एक डॉक्टरची. माझा अंदाज होता की बाबा  वकील आणि मुलगा डॉक्टर. पण बंगल्यावर कुठेही दवाखान्याची पाटी दिसत नव्हती. म्हण्जे हा केवळ रीसीडेन्शियल बंगला होता, अशावेळी घरामध्ये जाऊन डायरेक्ट विचारणार कसं की डॉक्टर आम्हाला तपासतील का?  शिवाय गेटवर लिहिलंय केवळ डॉक्टर, पीएचडीवाला डॉक्टर असला तर कुठं आपलंच हसं करून घ्या. आज दिवसाभरातून दोन तीनदा या रस्त्यावरून फिरताना चौकशी करावी का असं मनात येऊन गेलं पण ओळख ना पाळख असताना कसं कुणाच्या घरात शिरणार...


तरी मी म्हटलं  आपण घरात जाऊन विचारू. किमान या दोन अतरंगी बायांव्यतीरीक्त इतर कुठल्या डॉक्टरांचं क्लिनिक जवळपास कुठे असेल तर त्याचा पत्ता विचारू.. तीन दिवसांत जीवाला जरासुद्धा आराम पडलेला नव्हता. शेवटी मीच त्या बंगल्याचं गेट उघडून आत गेले आणि तिसर्‍या सेकंदाला लगेच बाहेर पडले. कारण, एक भलं मॊठं कुत्रं.



आता मी भीत तर शैतानालासुद्धा नाही. पण कुत्रं इज अ डिफ़रंट गेम अल्टूगेदर. रस्त्यावरून जाताना दूर कुठे जरी कुत्रं  भुंकायला लागलं की माझी बोबडी वळते. इथं तर कोल्ह्यासारखं दिसणारं कुत्रं भ्वाक भ्वाक भुंकत होतं. तापामुळे खूप अशक्तपणा आलाय असं जे काय वाटलं होतं ते या कुत्र्यामुळे दूर झालं इतक्या सुसाट वेगानं मी गेटबाहेर आले. सुदैवाने कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकून एक आजोबा बाहेर आले. तोवर आम्ही रस्त्यावरच उभे. मग काय हवंय कसं हवंय नवीन आलोय ताप आलाय डॉक्टर आहेत का? असा एक प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला. मध्येमध्ये कुत्र्याचे भुंकणे बॅकग्राऊंड म्युझिकला. बोलताना समजलं की हे आजोबाच डॉक्टर (मेडीकलवाले) आहेत; त्यांचा मुलगा वकील आहे. त्यांनी आम्हाला घरात बोलावलं (कुत्रं नीट बांधलं आहे ना याची दोनतीनदा चौकशी करून) आम्ही आत गेलो. त्यांचा दवाखाना गावाच्या दुसर्‍या टोकाला होता, पण तरी त्यांनी आम्हाला पाहून औषधं लिहून दिली, आणि म्हणाले. “कावीळ वगैरे काही नाही. तुम्हाला इथलं पाणी सहन होत नाहीये. मी माझं मेडीकल मंगळूरला केलंय त्यामुळे मला माहित आहे तिथल्या पाण्याची क्वालीटी. तुम्ही आर ओ वॉटर प्युरीफ़ायर बसवून घ्या, लगेच आराम मिळेल”  हे मात्र खरंय, मंगळूरचं पाणी अतिशय गोड आणि चांगल्या प्रतीचं. आम्ही तिथं असताना केवळ लेकीसाठी उकळलेलं पाणी आणि आम्हाला साध्या फिल्टरचं पाणी, इतकंच पुरत होतं. त्या पाण्याला मुळातच तहान शमवणारी गोडसर चव होती. मद्रासचं पाणी कितीही प्यायलं तरी तहान भागल्यासारखी वाटायचीच नाही. त्यामुळे वॉटर पुरीफायर ही इथें चैन नसून अत्यावश्यक गरज होती.



डॉक्टरांकडून बाहेर पडत असताना त्यांच्या कंपाऊंडमध्ये एक बाई अंगण झाडत होती. तिला इंग्लिशमधूनच विचारलं. “इथं कामाला आहेस का? आमच्याकडे काम करशील का?”
ती म्हणाली उद्यापासून येईन. अशा रीतीने पैसा वगैरे काहीही न बोलता काय काम करायचं हेही न ठरवता दुसर्‍या दिवसापासून सेल्व्ही आमच्याकडे कामाला येऊ लागली. मला या तिरपागड्या गावामध्ये स्थिर करायचं बरंचसं काम सेल्व्हीनं केलं. सेल्व्हीमुळे मला थोडंफार तमिळ  येऊ लागलं.  तमिळ पदार्थ आणि सणवार वगैरे समजत गेले.


सेल्वी धर्मानं ख्रिश्चन. पण तिला आमच्या दारात रांगोळी घातली जात नाही हे बिल्कुल सहन व्हायचं नाही. तिचा आणि माझा संवाद फार मजेशीर व्हायचा. ती तमिळमधून बोलायची, मी इंग्लिश आणि कानडीमधून. एकदा तिनं माझ्याकडं रांगोळी मागितली. मी तिला “बासमती चालेल?” असं विचारून पेलाभर तांदूळ दिला. तिनं कपाळावर हात मारून घेतला. (एफ वाय आय: तमिळमध्ये रांगोळीला कोलम म्हणतात. कोलम जातीच्या तांदळाचा इथं काहीही संबंध नाही) शेवटी तिनंच कुठूनतरी डबाभर रांगोळी आणली आणि रोज अंगण झाडून झाल्यावर पाणी मारून तिथं छानशी रांगोळी काढू लागली. बहुसंख्य तमिळ बायकांचं सकाळचं हे लाडकं काम असतं दारासमोरचं अंगण झाडून  पाणी मारून त्यावर रांगोळी काढायची. बहुतेकदा ही रांगोळी आपल्यासारखी ठिपक्यांची वगैरे नसते तर भौमितीक पॅटर्न्सनी सलग काढत गेलेली असते. ही सर्पाकृती, वेलीसारखे दिसणारे डीझाईन्स दिसायला खूप छान असतात आणि काढायला (सवय जमली की) फार चटकन होणारे असतात.



डॉक्टरांनी दिलेल्या औषधांनी ताप आटोक्यात आला, शिवाय लगेचच वॉटर प्युरीफायर बसवून घेतल्यामुळे आजवर पाण्यापासून काही त्रास झालेला नाही. डॉक्टरांना आम्हाला वारंवार यायला सांगून पैसे उकळणं सहज् शक्य होतं, तरीही त्यांनी एकाच फटक्यात योग्य निदान करून उपचार सुचवले त्याबद्दल आजही त्यांचे आभार मनापासून मानावेसे वाटतात. जगात देव आहे की नाही यावरून चिक्कार वाद घातला जाऊ शकतो. पण या जगामध्ये देवदूत आहेत हे मात्र नक्की.


राहिली ती आधीची डॉक्टरीण बाई. तर ती बोगस आहे हा माझा अंदाज दोन तीन महिन्यांतच बरोबर ठरला. ती कुठल्याशा हॉस्पिटलमध्ये नर्स वगैरे काम करत होती आणि तिथून सोडून आमच्या गावात दवाखाना थाटायला बघत होती. गरीबगुरीब लोकांना फसवणे हा तिचा मुख्य उद्देश. आमच्यासारखे यडे बकरे मिळालेत तरी चालेलच की. सुदैवानं कुणीतरी तिच्याविरूद्ध तक्रार केली आणि मग ती गाशा गुंडाळून पळून गेली असं ऐकलंय.



आमचा हा गाव मुख्यत्वेकरून कामगार लोकांचा गाव. जवळच असणारं मनाली पूर्णपणे इंडस्ट्रीअल भाग शिवाय याच गावापासून जवळ अशोक लेलॅंड, एन्नोर पोर्ट, थर्मल पॉवर प्लान्ट असे मोठेमोठे प्रोजेक्ट्स आहेत. या सर्व ठिकाणी काम करणारी लोकं इथे राहतात. (त्यात आमची म्हणजे कट्टुपल्ली शिपयार्डची नुकतीच भर पडली) पंचवीस तीस वर्षापूर्वी चेन्नईचं एक्स्टेन्शन म्हणून सरकारने हा भाग डेव्हलप करायला सुरूवात केली. इथे प्लॉट्स पाडून जमीनी विकल्या गेल्या. त्यावेळी बस-ट्रेन वगैरेची कनेक्टीव्हीटी मिळेल वगैरे बरेच प्लान्स होते. पण ते नंतर काही कामी आले नाहीत. परिणामी हे गाव सॅटेलाईट टाऊन म्हणून अजिबात विकसित झालं नाही. त्याकाळी बर्‍याच कामगारांनी स्वस्तात जमीनी घेऊन इथे घरं बांधली होती, हळूहळू सरकारचा इंटरेस्ट कमी झाला आणि इथला विकास अर्धवटच राहून गेला. पण त्यादरम्यान गावाला  विजेची, पाण्याची आणि रस्ते वगैरे सोयी चांगल्या मिळाल्या होत्या. (रस्त्यांची नंतर वाट लागली. आता परत सुधारले जात आहेत.) योजनाबद्ध रीतीनं गाव वसवलेलं असल्याने गाव अतिशय आटोपशीर आहे. नीट पाडलेले ब्लॉक्स आहेत. शाळा बांधल्या गेल्या आहेत. गावामध्ये मोठमोठी प्रचंड झाडं लावलेली आहेत. जरी एकेकाळी बहुसंख्य वस्ती कामगारांची असली तरी आता मात्र गावामध्ये इतरही बरेच लोक राहत आहेत. आजूबाजूच्या खेड्यांपेक्षा या गावामध्ये सुशिक्षितांचं प्रमाण जास्त आहे. तीन चार चांगल्या शाळा आहेत, परिणामी स्थलांतर करून येणारे मजूर इथं भाड्यानं राहण्याचं प्रमाणही जास्त आहे. इथे जवळजवळ प्रत्येक घरामध्ये दोन किंवा तीन खोल्या एक्स्ट्रा काढून ते भाड्यानं द्यायची पद्धत आहे. दूरवरून आलेल्या गरीब मजूरांना (हे जास्तकरून युपी, बिहार, ओरिसा आणि आंध्रमधून येतात) नाडणारे लोकंही मग आपसूकच जास्त आहेत. वरच्या बोगस डॉक्टरणीचं तर केवळ एक उदाहरण, अशीच काही उदाहरणं नंतरही दिसलीच. नवीन ठिकाणी आल्यानंतर माझ्यासारखी शिकली सवरलेली बाई जर इतकी भांबावू शकत असेल तर शाळेचं कधीही तोंडही न पाहिलेल्या आजवर युपी बिहारच्या त्या गावामध्ये असताना कधीही बाहेरदेखील न पडलेल्या मुली जेव्हा नवर्‍याबरोबर इथं येतात तेव्हा त्या किती भांबावून जात असतील?


मी इथं राहून आता बर्‍यापैकी रूळल्यानंतर काही बायका मदतीसाठी माझ्याकडे येतात – ही नवीन भाडेकरू आलीये, हिला काही समजत नाहीये काय म्हणतेय ते जरा सांगा. मग मी त्या नवभाडेकरणीचं हिंदी समजून घेऊन ( आपली हिंदीची झेप ही बॉलीवूडी हिंदीपर्यंतच आहे!! तरीही हल्ली युपी बिहारी आणि छत्तीसगढची हिंदी हे वेगवेगळे भाषेचे प्रकार आहेत हे समजायला लागलंय) मला ते या तमिळ बायकांना तमीळमध्ये समजवायचं असतं. अशावेळी आपण शाळेत संस्कृत घेतलं होतं, आपण बरेच हिंदी पिक्चर पाहिलेत, आणि आपलं शिक्षण मराठी माध्यमातून झालंय, आणि आपली मातृभाषा कानडी आहे याचा जो काय सणसणीत उपयोग होतो त्याबद्दल नंतर सविस्तर कधीतरी!!!



काही तमिळ बायका मला अजूनही हिंदीअम्मा म्हणतात. मी मराठी आहे असं सांगून काही उपयोग होत नाही. आपण नाही का सर्रास सर्व दाक्षिणात्यांना “मद्रासी” म्हणत. मग त्यांनी सर्व नॉर्थलाच एका तागडीत तोललं तर आपण का चिडावं?


पण आता मद्रासमध्ये येऊन महिना झाला होता. इतके दिवस मनाली न्यु टाऊनच्या खेड्यामध्ये ऍडजस्ट करण्यामध्येच गेले होते. पण अजून अख्खं मद्रास आपली वाट बघतंय. पुढच्या लेखापासून मद्रास भटकंती चालू!! 

Tuesday 29 September 2015

MADरास- २

एकंदरीत मद्रासमध्ये आल्याआल्या आमचे खूपच हाल झाले. पहिल्या दिवसाचं वर्णन तर यथासांग केलंच आहे. दुसर्‍या दिवशी जाऊन गॅसचं दुकान शोधणं, सिलेंडर लावून घेणं, बाजार शोधून भाज्या दूध फळं यांची सोय करणं, दूधवाला शोधून रतीब लावणं वगैरे सर्व कामं करायची होती. घरासमोरच एक आज्जीआजोबा राहत होते. आजोबांकडे तीन चार भाडेकरू ठेवलेले होते. पैके दोन घरं मारवाड्यांची होती, म्हणजे एका गोष्टीची निश्चिंती झाली. “हिंदी” बोलता येणारं कुणीतरी होतं. आज्जीआजोबा आमच्या घरमालकांचे चांगले परिचित. सकाळीच आजोबांनी येऊन काही मदत हवी असेल तर सांगा असं सांगितलं. तेव्हा आजोबांशी बोलताना अजून एक दिलासेदार बाब समजली. आजोबांना इंग्लिश व्यवस्थित येत होतं. पन्नास वर्षांपूर्वी ते मुंबईमध्ये नोकरी करत होते, त्यामुळे थोडीफार मराठी समजायची, बोलता येत नव्हतं पण त्यांचं इंग्लिश मात्र खणखणीत होतं. या अंकलमुळे आमचे मद्रासचे हे सुरूवातीचे दिवस थोडे सहज गेले. त्यांनी कामवाली शोधून दिली, तिच्याशी काय काम किती पैसे किती वाजता येणार वगैरे बाबी ठरवताना भाषांतरकार म्हणून ते हजर राहिले. नंतर पहाटे त्यांच्या घरी दूध घेऊन येणार्‍या माणसाकडे आमचा रतीब लावून दिला. इतर  दुकानाचे पत्ते वगैरे सर्व त्यांनीच दिले.


गॅसचं दुकान घरापासून अगदी जवळ. हायवे ओलांडला की  लगेच समोर. तिथं जाऊन सर्व कागदपत्रं पैसे वगैरे दिल्यावर काऊअंटरवरचा माणूस म्हणाला “चार पाच दिवसांत सिलेंडर येईल” धाबं परत दणाणलं. म्हटलं. अहो, लवकर द्या. (इथं लिहायला सोप्पंय. प्रत्यक्ष संवाद साधताना मला तमिळ येत नाही आणि समोरच्याला हिंदी इंग्लिश येत नाही अशा भाषिक करामती चालू) लहान बाळ आहे. मला स्वयंपाकाचा त्रास होइल. आम्ही इथं नवीनच आलोय  वगैरे वगैरे. शेवटी ववैतागून तो म्हणाला. “लेट्स सी वाट आय क्यान डू” तेवढ्या प्रॉमिसवर आम्ही परत यायला निघालो तर दारामध्ये एक बाई उभी होती. “शो मी युअर पेपर्स” म्हणाली. आम्ही ते बाड तिच्या हाती दिलं. तिनं कुणालातरी हाक मारली आणि काहीतरी सांगितलं. बरोबर दोन मिनीटांत रेग्युलेटर आमच्या हातात आणून दिला आणि दिवसाभरात सिलेंडर घरी पोचेल असं सांगितलं. (या बाई आपल्याला नंतर परत भेटत राहतीलच)


हुश्श! एक लढाई पार पडली. घरी सिलेंडर लागला की स्वयंपाकाची सर्व सोय झाली. इंडक्शन मायक्रोवेव्हवर कालचा आजचा दिवस पार पाडला होता, पण गॅस चालू झाल्याखेरीज जीवाला चैन पडली नसती. गॅस दुकानामधून बाहेर येऊन जवळच्याच ए्का  साध्या मेससारख्या  हॉटेकामध्ये जेवलो. तमिळ स्टाईल जेवणाची पहिलीच वेळ. केळीच्या पानावर वाढलेला भाताचा ढीग, त्यावर ओतलेलं सांबार, रस्सम आणि सोबत तीन चार भाज्यांच्या वाट्या. शिवाय दही. सुनिधीला बिस्कीट दिलं तर नक्को असं बाणेदारपणे सांगून तिनं नुसता भात खाल्ला. रस्सम वगैरे अतिजहाल असल्यानं तिला खाता येणं शक्य नव्हतं. माझी लेक तमिळनाडूमध्येच लहानाची मॊठी व्हायला किती योग्य आहे याची ही पहिलीच चुणूक. तिला जेवणामध्ये तिन्ही त्रिकाळ भात असला तरी फरक पडत नाही. दोन दिवसांपासून कोरडं सुकं काहीतरी खात होतो. गरम पांढराशुभ्र भात आणि त्यावरचं ते लालभडक रस्सम जीव तृप्त करून गेलं.


घरी येऊन पोचलो आणि आमच्या मागोमाग सिलेंडर आला (हे कसं घडलंतर सिंपल आहे. आम्ही जेवेपर्यंत गॅसवाला दुकानतच होता, आम्ही बाहेर पडलेलं पाहिल्यावर आमच्या मागून हातगाडीवर सिलेंडर टाकून घेऊन आला) मग फ्रीज चालू करणे.. दूध तापवणे, वगैरे कामे चालू झाली. किचनमधलं सामान लावून घेतलं. हळूहळू कपाट लावणं वगैरे करत घर आकाराला आणत गेलो.


झिलमिल सितारॊंका आंगन होगा रिमझिम बरसता सावन होगा सारख्या कविकल्पनांनी नटवून घरं लावणारी लोकं कुठं असतात हो? इतक्यांदा घर सोडून परत घर लावलंय पण तरी दर वेळेला नवीनच काहीतरी समस्या वाट बघत उभ्या असतात. आमच्या या घराचा हॉल प्रशस्त होता, पण किचन छोटं होतं. अर्ध्याहून जास्त सामान किचनसमोर असलेल्य बेडरूममधेय ठेवावं लागलं (त्यामूळे आजही मला स्वयंपाक करताना किचन टू बेडरूम- जी सध्या स्टोअररूम म्हणून ओळखली जाते- धावपळ करावी लागते). किचनमध्ये असलेलं सिंक हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्यावर नंतर लिहेनच.



सध्या मात्र हे घर लावणं आणि एकंदरीत सेटल होणं हे सुरू होतं. हे करत असताना सर्व काही सुरळीत गोडीगुलाबीत अज्जिब्बात चालू नव्ह्तं. मद्रासमध्ये आल्यापासूनच माझी स्वत:ची प्रचंड चिडचिड होत होती. आयुष्यामध्ये कुठल्या क्षणाला तुम्हाला स्वत:विषयी कायतरी नवीन ज्ञान होइल हे सांगता येत नाही. तसं माझं इथं आल्यानंतर थोड्या दिवसांनी झालं.


मला बदल सहन करता येत नाही. बदल आवडतो, बदल हवा असतो. पण त्या एकंदरीत सेट झालेलं आयुष्य पूर्णपणे विस्कटून टाकताना  आणि त्यांची नंतर परत घडी घालताना मध्ये जो ट्रान्स्झिशन पीरीयड असतो तो मला अजिबात सहन होत नाही. मंगळूरहून मद्रासला आल्यावर हे फारच प्रकर्षानं जाणवलं. मी प्रत्येक गोष्टीची फूटपट्टी मुंबई अथवा मंगळूरची लावत होते. हे वेगळं शहर आहे, वेगळं गाव आहे हे माहित होतंच तरीही “इथं मुंबईसारखं नाही, मंगळूरसारख्या भाज्या मिळत नाहीत” वगैरे टुमणी चालूच होती. सतत चिडचिड सतत तक्रारी. एक-दोनदा अशाच कसल्यातरी फुटकळ गोष्टीवरून संताप येऊन हातामध्ये होती ती वस्तू फेकून पण दिली. राग यायला काही खास कारण होतंच अशातला भाग नाही. मद्रासमध्ये आल्या आल्या दोन तीन दिवसांचे जे काय निगेटीव्ह घडलं होतं तेच मनामध्ये घर करून बसलं होतं. “आपण इथं राहूच शकणार नाही” याची खात्री पटली होती. नवर्‍याला नवीन नोकरी होती, त्याला जास्त दिवस सुट्टी घेऊन चालणार नव्हतं. तो ऑफिसला जायला निघाला की माझी चिडचिड चालू व्हायची. विनाकारणच. काही गरज नसताना. आज मागे वळून पाहताना जाणवतंय की कदाचित “तो नोकरी करतोय आणि मी घरात बसून आहे” या भावनेनं ती चिडचिड होत असावी. इथं येतानाच ही गोष्ट स्पष्ट झाली होती, की मी नोकरी करू शकणार नाही. घरीच बसावं लागेल. मग चिडचिड होणार नाही का? आई़चा फोन आला तेव्हा दोन तीनदा रडलेसुद्धा. हा सगळा संताप कळत नकळत का होईना लेकीवर पण निघत होताच. एक तर तो इवलासा भांबावलेला जीव. इतके दिवस त्याच्या आजूबाजूला असणारे कुणीच दिसेनात. घर वेगळं. जागा वेगळी. त्यात परत आई अशी सारखी वसवस करत असलेली. बिचारं माझं लेकरू दिवसभर मला नुसतं चिकटून बसायचं. जरा दूर केली की रडायची आणि मग माझी कामं होत नाहीत म्हणून मी अजूनच चिडायचे. दोन तीनदा धपाटे पण घातले.



 एखादी गोष्ट माझ्या मनाविरूद्ध घड्ली तर चिडायची ओरडायची ही काय पहिलीच वेळ नाही. अशावेळी मी खूप बडबडते. अगदी तोल जाईल इतकी बोलते. पण ते बोलणं हेच माझ्यासाठी व्हेंट आऊट असतं. मनात खदखदत असलेली एखादी गोष्ट बोलून टाकली की तीच गोष्ट इतकी खदखदत नाही. मला इथलंच काहीच आवडलं नव्ह्तं. हवामान् चांगलं नव्हतं. खूप गर्मी होती, घरामधलं टॉयलेट खूप लहान होतं. किचनमध्ये सिंक नव्हतं. मायक्रोवेवला सेपरेट कनेक्शन नव्हतं. आधी राहणारे भाडॆकरू खूप घाणेरडे होते. फरशीवर काळे डाग पडले होते, केबलवर हिंदी चॅनल जेमतेम होते. गेटची कडी फार जोरात आवाज करते, इथं भाज्या चांगल्याच मिळत नाहीत. इथं पालेभाज्या दिसत सुद्धा नाहीयेत. इथल्या दुधावर साय येतच नाही. इथं धूळ फार आहे. इथलं पाणी खूप वाईट आहे. समोरच्या अंकलनी शोधून दिलेली कामवाली नीट काम करत नाही, ती कपडे नीट पिळून वाळत घालत नाही. एक ना दोन. हजार गोष्टी होत्या, ज्या मला पटत नव्हत्या. आणि त्या गोष्टी मला पटत नव्हत्या म्हणून माझी चीडचीड होत होती.



यापैकी कुठलीही गोष्ट बदलणं खरंतर नवर्‍याच्या हाती नव्हतं पण मी सोयीस्कररीत्या प्रत्येक गोष्टीचं खापर मात्र त्याच्या डोक्यावर फोडून मोकळी झाले होते. “त्यानं” “त्याच्या” “करीअरसाठी” ही नोकरी पकडली आणि म्हणून “माझी” अवस्था इतकी वाईट झाली असा एकंदरीत माझा निष्कर्ष होता. निर्णय घेताना दोघांनी आपापसांत चर्चा करूनच घेतलेला निर्णय होता, त्याच्या स्वभावानुसार तो कुठलीही गोष्ट धाडकन करून मोकळा होत नाही. प्रत्येक निर्णयापूर्वी चारी बाजूंनी विचार करून त्याचे फायदेतोटे काय आहेत याचा हिशोब मांडून मगच निर्णय घेतो. मेच त्याच्याउलट आहे. तो माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी मी घेतलेले बहुतेक निर्णय इंपल्सीव्हली अचानक घेतलेले आहेत. आधी निर्णय घ्यायचा, मग त्यानुसार वाट काढायची असा माझ्या आयुष्याचा आलेख. नंतर दोघांनी एकत्र रहायला सुरूवात केल्यावर अर्थातच दोघांच्याही आयुष्याचे महत्त्वाचे निर्णय एकमेकांचा विचार करूनच व्हायला लागले. हे इथवर ठिक होतं. प्रश्न उभा राहतो तो निर्णय घेतल्यानंतर चुकवायच्या किमतीचा. त्याला ही किंमत फार थोडी चुकवावी लागली होती. उत्तम नोकरी,  प्रवासासाठी कमी वेळ, लेकीला सांभाळायची काहीच जबाबदारी नाही आणि रहाण्यासाठी उत्तम जीवनशैली असं चांगलं पॅकेज मिळालं होतं. माझ्याबाबतीत तसं काहीच घडलं नव्हतं. नोकरी अद्याप शोधायची होती, पण त्यासाठी दिवसाचा पाच ते सहा तास प्रवास (तीन ते चार वाहनं बदलून) करावा लागला असता, लेकीला सांभाळण्यासाठी काहीतरी सोय करावी लागली असती. इतकं करून भरभक्कम पगाराची नोकरी मिळेलच याची अजून शाश्वती नव्हतीच.


या सर्वांचा परिणाम माझ्या चिडचिडीमध्ये !! सुदैवानं माझ्यापेक्षा माझा नवरा मला अधिक ओळखून आहे. त्यामुळे माझी ही चिडचिड त्यानं समजून घेतली. त्यावर त्याच्यापरीनं करता येईल तितके उपाय त्यानं केले, पण त्याहून जास्त महत्त्वाचं म्हणजे हे सगळे बदल माझ्यापद्धतीनं इंतीग्रेट होण्यासाठी जितका वेळ लागेल तितका वेळ मला दिला. परवाच कधीतरी अविनाश अरूणचा “किल्ला” सिनेमा बघताना नवर्‍यानं मला टॊमणा मारलाच होता, “त्या सातवीच्या पोराला समजूतदारपणा आहे, आणि आमचं ध्यान अजून चडफड करतंय!”


तरी सुदैवानं आता चडफड खूप कमी झाली. जसे दिवस पालटत गेले तशी मी या जागेशी, घराशी, गावाशी खूप कंफर्टेबल होत गेले. मला कुणीच ओळखत नाही, माझ्याशी बोलायला कुणीसुद्धा नाही म्हणून सुरूवातीला खूप वाईट वाटायचं. सशेजारी बहुतेक तमिळ्मध्यमवयीन टिपिकल गृहिणी बायका. मी यांच्याशी काय बोलणार? भाषा येत नाही आणि तसेही बोलायचे कुठलेच विषय सारखे नाहीत. टिपिकल तमिळ गृहिणींसोबत मी कशी कम्युनिकेट करू शकले असते? पण हळूहळू “अलोहोमोरा” मंत्र प्रत्येक ठिकाणी मिळायला लागला.


आम्ही रहायला येऊन तीन चार दिवस झाले असतील, सुनिधीला घेऊन गेटमध्ये उभी होती. शेजारची मुलगी दुकानामध्ये निघाली होती. सहज पुढं येऊन “घर आवरलं का? वगैरे विचारत बोलू लागली.. ही बी एडच्या शेवटच्या वर्षाला होती. संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेलं असल्यानं भाषेची अडचण नव्हती. मग पाच दहा मिनीटं असंच काहीबाही बोलताना म्हणाली.. “हू इज युअर फेवरेट हीरो?”

आपण सेकंदभराचाही वेळ न दवडता उत्तर दिलं “सलमान”


ती किंकाळली. “इव्हन माय फेवरेट हीरो. आय जस्ट लव्ह्ड हिम इन किक”

“मला तो खामोशीमध्ये फार आवडला.”


“खामोशी?” हा पिक्चर तिला माहित नव्हता. मग मनीषा कोईराला (दॅट हीरॉइन इन बॉम्बे) संजय भन्साळी (ओह, देवदास आं!!) वगैरे वगैरे विषय सुरू झाले. ती आणि मी आमच्या घराच्या गेटमध्येच बोलत होतो. बोलताना “व्हाय शाहरूख इज बेटर दॅन सलमान” वर परिसंवाद चालू झाला. तिची आई, पलिकडच्या भाभी, तिच्या पलिकडच्या घरातली वनिता सगळे बिनबुलाये आम्हाला सामिल झाले. हिंदी, तमिळ, इंग्लिश अशा तिन्ही भाषांमधून संवाद सुरू राहिला. गॅस एजन्सीमध्ये काम करणार्‍या शैलाआंटी (त्याच आधी उल्लेखलेल्या) दुकान बंद करून येत होत्या. त्या आमच्या गप्पांमध्ये खुशाल सामील झाल्या. मग गॅस सिलेंडरवरून विषय “आज क्या काना बनाया?”या आद्यप्रश्नाकडे वळाला. नंतरच्या गप्पा काय सांगायला हव्यात का?

गप्पा मारायला बोलायला काय विषय असं राहिलंच नाही. बॉलीवूड हा विषय भारतात कुठंही कायम हिट्ट विषय राहिलेलाच आहे.


अर्थात शेजारीपाजार्‍यांशी गप्पा चालू झाल्या म्हणून जादूची कांडी फिरल्यागत माझी मन:स्थिती ठीक झाली असं नाहीच. त्याला अजून खूप वेळ आहे. अजून माझा या गावाशी परिचय चालू आहे. इथं आल्यानंतर पंधरवड्यातच कामवाली सोडून जाणे या दणक्याला सामोरं जायचं आहे. आणि त्यानंतर मद्रासमधली सर्वात भयानक गोष्ट घडणार आहे. “इथलं पाणी बादणे!”


पण ते सर्व नंतर! तूर्तास संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी रस्ताभर इतर मुलांसोबत खेळताना धावत असणारी माझी मुलगी, हातात शेजारणीनंच आणून दिलेला फिल्टर कापीचा टंबलर आणि एकमेकांची नावं जाणून घेत ओळखी करून घेणारी मी.

(क्रमश: )


Sunday 20 September 2015

MADरास -१

नवर्‍याला मद्रासला नोकरी मिळाली तेव्हा मी सर्वात जास्त खुश झाले होते. मंगळूर वाईट नाही, उलट मोठ्या शहराच्या सर्व सोयीसुविधा असलेलं एक निवांत शहर् आहे. शाळेच्या-कॉलेजच्या उत्तमोत्तम सोयींसाठी मंगळूर मला कायम आवडत राहील. अशा या ठिकाणी लेकीचं शिक्षण होणार म्हणून बरं पण वाटायचं.
पण... लेकीची शाळा सुरू होण्याआधीच नवीन नोकरी, नवीन शहर, नवीन भातुकली. ती पण पूर्णपणे अनोळखी शहरामध्ये.


लग्नानंतरच्या पाच वर्षामध्ये तीन वेळा शहरं बदलून झाली होती, आता परत इथलं सगळं स्थिरस्थावर सोडून नवीन कुठेतरी जायचं का अशी धाकधूक होतीच. शेवटी महिना पंधरादिवस चर्चा करून करून मी आणि नवर्‍यानं “चलो मद्रास” असा निर्णय घेतला.


मंगलूरमध्ये असलेले बहुतेक तमीळ कलीग्ज इकडे खटपट करत होते, आमची नोकरी पक्की झाली तशी मात्र बहुतेकांनी “तू अजोबात जाऊ नकोस. शहरापासून फर लांब आहे. तुम्ही ऍडजस्ट होऊ शकणार नाही” वगैरे चालू केलं. अर्थात आम्ही निर्णय घेतलाच होता. कूठंही ऍडजस्ट होऊच याची मला खात्री होती.


शिवाय काही झालं तरी मद्रास मोठं शहर आहे. तिथं मलादेखील परत जॉब सुरू करता येईल अशी आशा वाटत होती. सोबत अद्याप मतदानाचा हक्क नसलेलं पण अतिशय महत्त्वाचं असं आमचं दोन वर्षांचं टिल्लं होतं. तिच्यादृष्टीनं हा बदल फार मोठा होता, तरीदेखील जायचंच असं आम्ही ठरवलं.  मग पॅकिंग, आवराआवरी, गॅस परत देणं, बॅंक अकाऊंट बंद करणं वगैरे वगैरे सर्व खटपटी चालू झाल्या.


१ सप्टेंबरला आम्ही मंगळूरवरून मद्रासला यायला निघालो. रात्री नऊ वाजता सुट्णारी ट्रेन दुसर्‍या दिवशी दुपारे दोननंतर मद्रासला पोचली. वास्तविक मंगळूर आणि मद्रास हे भारताच्या नकाशावर समोरासमोर आहेत. एक पश्चिम किनार्‍यावर आणि एक पूर्व किनार्‍यावर. पण आमची भारतीय रेल्वे अशी सरळ येत नाही. मंगळूरवरून निघालेली ट्रेन खाली दक्षिणेला केरळात जाते तिथून तमिळनाडूमध्ये आणि मग परत वर उत्तरेला चढून चेन्नईला येते. इतकी लांबवर फिरून का येते माहित नाही...

मंगळूरात संध्याकाळी पाच वाजता सामानाचा ट्रक भरून पाठवल्यावर रिकाम्या घरामध्ये अक्षरश: करमेना. सुनिधी तर पार बावचळली. घर तर दिसतंय, पण सामान काहीच नाही... सगळीकडे धावता येतंय, पण खेळायला काहीच नाही..
रात्री आम्हीही ट्रेनमध्ये बसलो. बाय रोड ट्रक दुपारपर्यंत पोचला असता, आम्ही संध्याकाळपर्यंत. “तुम्ही येईपर्यंत ट्रक दारामध्ये लावतो आणि झोप काढतो” असं पॅकर्सवाला माणूस म्हणाला होता. त्याचे दिव्य प्रताप नंतर सविस्तर सांगूच.

आता जरा फ़्लॅश फॉरवर्ड मारते आणि मद्रासमध्ये येते.


मद्रासमध्ये सतिश जॉइन व्हायला जाणार आणि तेव्हाच घर शोधून वगैरे येणार होता, पण आम्हाला मद्रासची काहीच माहित नाही. दोन्तीन तमिळ मित्र-मैत्रीणींना “काटुपल्लीला जॉब आहे तर तिथून रहायला कुठले एरिया जवळ पडतील” असं विचारून पाहिलं तर त्यांना काटुपल्ली कुठं आहे तेच माहित नव्हतं. मग मदतीला आला तो सतिशचा एक ज्युनिअर. अतिशय अवली कॅरेक्टर आहे. बापाकडे चिकार पैसा, लहानपण सगळं गल्फमध्ये गेलेलं. कशीबशी मिळवलेली इंजीनीअरींगची डिग्री आणि नोकरीला लागेस्तोवरच महिन्यातले वीस दिवस दारूमध्ये. असा हा पंचवीसेक वर्षाचा मुलगा. म्हणे. “सर, मै आपको घर दिलवाता हू. मेरा उधर बहोत पहचान है” मंगळूरहून सतिशसोबत स्वत: आला, त्याचा एक काका इथल्या राजकारणात बराच  ऍक्टीव्ह आहे, त्याला सोबत घेतलं आणि हे घर शोधलं. “घर शोधणे” या कामासाठी (काही पूर्वानुभव लक्षात घेऊन) सतिशनं दोन दिवस ठरवले होते. पण प्रत्यक्षात दोन तासामध्ये हे घर फायनल झालं.
“हा एरीया राहण्यासाठी तुम्हाला सर्वात जास्त योग्य आहे” त्या असिस्टंटच्या काकांनी ठामपणे सांगितलं. “इथून जाणं येणं सोयिस्कर आहे, शिवाय शाळा वगैरे सर्व जवळ आहे” प्रत्यक्षात खेड्यासारख्या दिसणार्‍या या मनाली न्यु टाऊनबद्दल सतिश फारसा काही इम्प्रेस्ड नव्हता, पण आधी येऊ, आणि मग बघू असा त्यानं विचार केला.

मला घराचे वगैरे फोटो मेसेजवर पाठवले ते ठिकठाक वाटले. चेन्नईचा पहिला सणसणीत फटका आम्हाला बसला तो घरभाडं ऐकल्यावर. चेन्नई हे फार स्वस्त शहर आहे असं का म्हणतात ते आम्हाला तेव्हा समजलं. मंगळूरला  चार खोल्यांच्या फ्लॅटला जितकं भाडं भरत होतो, त्याच्या निम्मं भाडं एका स्वतंत्र बंगल्याचं. पाच मोठ्या खोल्या, पाठीमागे अंगण, पुढं छोटंसं अंगण. दोन माड आणि बाग. एवढं सर्व त्या भाड्य़ामध्ये. सतिश घर फायनल करून मंगळूरला परत आला.

तर आता परत बॅक टू ट्रेन. रात्रीचा प्रवास पॅकिंगच्या दमणूकीमुळं झोपूनच झालेला. सकाळी ट्रेन कुठल्याशा स्टेशनवर थांबली होती, तेव्हा मी सतिशला म्हटलं. “आता या क्षणी आपण रस्त्यावर आहोत. सर्व सामान ट्रकमधून रस्त्यावर आणि आपण ट्रेनमध्ये”


“ट्रॅकवर” कुठल्याही क्षणी लॉजिकची कास न सोडणारा नवरा वदला. दुसरा एखादा माणूस असता तर “कशाला घाबरतेस सर्व ठिक होइल” वगैरे धीराचे शब्द बोलला असता की नै. आमच्यात तशी पद्धतच नाही.
तर ट्रेन मद्रासला पोचली. (इथं विस्तारभयामुळे सुनिधीच्या रडण्याचे, खेळण्याचे वगैरे डीटेल्स लिहत नाहीये. पण प्लीज बी नोटेड. हा सर्व वेळ तो इवलाला जीव आमच्याच सोबत होता. तिला तेव्हा बोलतादेखील येत नव्हतं. सर्व कम्युनिकेशन खाणाखुणांनीच)


ट्रेन मद्रासला पोचल्यावर सतिश ट्रकवाल्याला फोन करू लागला. “कुठं आहेस” म्हणून विचारायला. त्याचा फोन स्विच ऑफ. धाबं दणाणणं म्हणजे काय त्याचा प्रत्यय आला. तरी त्या पॅकर्स मूव्हर्स दिलेले अजून दोन तीन नंबर ट्राय केले. सर्वच बंद. मंगळूरच्या ब्रॅंचला फोन केला तर तो म्हणे “वो तो पहुंच गया होगा, आप उधर जाना” या सर्व धांदलीमध्ये स्टेशनवर पोचल्यावर काहीतरी खाऊन घेऊ असं ठरवलं होतं ते विसरूनच गेलो. सुनिधी झोपेत होती, बाहेर येऊन फास्ट ट्रॅकची प्रीपेड टॅक्सी बूक केली आणि मनाली न्यु टाऊनकडे निघालो. टॅक्सी चालक (हा अत्यंत खडूस जमातीचा होता, वाटेत दोन मिनिटं गाडी थांबव बिस्कीटांचा पुडा घेऊ म्हटलं तर अजिबात थांबला नाही. हिंदी इंग्लिश समजत नाही म्हणे!) सूड उगवल्यासारखा शॉर्टकट म्हणून चेन्नई डंपिंग ग्राऊंडच्या रस्त्यानं घेऊन आला. त्या वासानं मला मळमळू लागलं, आणि सुनिधीला उलटी झाली. चेन्नई म्हणजे मुंबैइ सारखी मेट्रो सिटी हे चित्र कूठेच दिसेना. एरवी तमिळ सिनेमांअधून दिसणारी सुरेख चित्रासारखी चेन्नईदेखील दिसेना. छोट्या छोट्या गल्ल्या, (धारावीची आठवण देणार्‍या), खड्डेमय रस्ते यातून बाहेर एकदम हायवेलाच लागलो आणि आता हे डंपिंग ग्राऊंड.. आपल्याला जर चेन्नईमध्ये फिरायचं  झालं तर रोज या रस्त्यानं यावं जावं लागणार...


मंगळूर सोडून चेन्नईमध्ये गेलो तर मला नोकरी करता येईल. इथं माझ्या क्षेत्रासाठी चांगल्या संधी उपलब्ध आहेत  वगैरे वगैरे सर्व काही धुरळयत उडून गेलं. रोज तीन ते चार तासाचा हा प्रवास (कारमधून अडीच तास, पब्लिक ट्रान्स्पोर्टने त्याहून जास्त) झेपेल का? वगैरे विचार येऊ लागले. “तुला टूव्हीलर घेऊन फिरता येईल गं” आमचे मनकवडे पतीराज म्हणाले.


आणि... मग सुरू झाला आमचा जगप्रसिद्ध एन्नोर पोर्टचा हायवे. हे भलेमोठे वीस चाकी वगैरे कंटेनर्स. शुरू कहंपे होते है और खत्म कहांपे पताही नही चलता टाईप्स. दोन तीन दिवस इथ्लं कंटेनर्सच ट्राफिक अडलेलं असतं. त्याच्या मधून अडथळ्यांची शर्यत पार केल्यासारखा कार आणि बाईक्स जातयेत असतात. इथं मी टूव्हीलर चालवणं म्हणजे अवतार समाप्तीची घोषणाच.


अजून त्या  ट्रकवाल्याचा फोन लागत नव्हता. सामानाचं काय... किंमत किती असेल ती असो, पण घराचं प्रत्येक सामान होतं त्यामध्ये. टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन, ओव्हन, कपाट, कपडॆ, बेड, अंथरूणं, लेकीची खेळणी... भांडी, बादल्या, मग, देवघर, ढीगभर पुस्तकं आणि काय नी काय... परक्या गावात येऊन सामान हरवलं अस्तं तर आमची काय अवस्था होइल...

नवर्‍याचं टेन्शन हळूहळू वाढत होतं. मी खिडकीतून बाहेर बघून अजूनच हताश होत होते, लेकरू उलट्यांनी वैतागलं होतं. शेवटी येऊन पोचलो एकदाचे मनाली न्यु टाऊनला. घरमालकांनी ओळखीच्या एकांकडे चावी देऊन ठेवली होती. सुदैवानं त्या नवरा बायकोला उत्तम इंग्लिश येत होतं. त्यामुळे व्यवस्थित बोलता आलं. कॉफी घेता घेता ट्रकवाल्याला फोन करणं चालूच होतं. अखेरीस त्यानं फोन उचलला आणि म्हणाला “रंड निमिष्गं वरो” दोन मिटांत काही आला नाही पण दहा मिनिटांनी मात्र आमच्या सामानाचा ट्रक आला आणि आम्ही चावी घेऊन आमच्या नवीन घराकडे निघालो. एव्हाना सहा वाजून गेले होते. हुश्श म्हणतच होतो तितक्यात....

... धो धो पाऊस चालू झाला. दारात सामानाचा ट्रक उभा. त्यातले तमिळ हमाल काय बोलतात ते कळत नाही. चावीनं दार उघडलं तर गुडुप्प अंधार (आमच्याकडे पाऊस आला की लोकं छत्री उघडत नाहीत, टी एन ई बी वाले लाईट मात्र काढतात) इतकावेळ कुठंतरी निवांत झोपलेल्या त्या ट्रकवाल्याला आता सामान उतरवायची काय घाई लागली होती कुणास ठाऊक. घरामध्ये आम्हाला काहीच दिसेना. घरमालकानं पेंट काढून घेतला होता, त्याचा वास अख्ख्या घरात कोंडलेला, आणि पेंटींगचं काम झाल्यावर घर झाडून वगैरे घ्यायचं असतं हे पेंटर लोकं विसरली होती बहुतेक. पायाला सगळा चिखल लागत होता. फरशी कुठल्या रंगांची ते ही समजलं नसतं. इतकी घरात घाण होती. पटकन एक झाडू मारून घ्यावा म्हटलं तर तेही होइना. भरीसभर हमालांनी बदाबदा सामान आणून फेकायला सुरूवात केली. पुस्तकांचा एक खोका आणि गादी कशी काय पण चप्प भिजलेली होती.

गॅस चालूच नव्हता, इंडक्शन होता, पण लाईट नव्हते.
घरभर सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं. झोपायची गादी भिजली होती. बेड अजून जोडायचा होता.
मद्रासमध्ये रहायचं म्हणून जी काय चित्रं रंगवली होती ती आतापर्यंत सर्व पुसली गेली होती. हे आणि असं होइल अजिबात वाटलं नव्हतं. बाहेर पाऊस अजून धडाधडा कोसळतच होता. प्रचंड भूक लागली होती, पण खायला केवळ कोरडा खाऊ होता. ज्यांच्याकडे चावी दिली होती ती बाई संध्याकाळी म्हणाली होती की रात्री मी जेवण आणून देईन. साडेनऊ वाजता तिचा फोन आला की आम्ही बाहेर कुणाच्यातरी बर्थडेला आलोय, इथंच उशीर होइल. आम्हाला घरी यायला अकरा वाजतील. म्हणजे तात्पर्य रात्रीच्या जेवणाची सोय तुम्हीच करा. आधीच सांगितलं असतं तर सतिश बाहेर जाऊन हॉटेलातून काही घेऊन आला असता.



काल सकाळी पॅकिंगच्या कामापासून मी आणि सतिश दोघंही दमलो होत. सोबत सुनिधी होतीच. रात्रभर आणि दिवसभर प्रवास. खाण्यापिण्याचे हाल. आता बाहेरून जेवण आणावं तरी शक्य नाही. लाईट नाहीत. बाहेर पाऊस. अनोळखी गाव आणि भाषा माहित नाही.

सुनिधीसाठी मिल्क पावडरचं दूध बनवलं त्यात बिस्कीट कालवून खाऊ घातलं. भुकेजलेलं लेकरू तेवढं खाऊन लगेच झोपलं पण!

आम्ही प्लेटभर सुका चिवडा आणि लाडू इतकंच डिनर करायचं ठरवलं....  
देवाक काळजी!!


(क्रमश: ) 

Monday 14 September 2015

MADरास - ०

“कम आऊटसाईड” शेजारीण मला हाक मारतेय. रात्रीचे साडेआठ वाजलेत. नवरा चारपाच दिवसांसाठी  समुद्रांत् गेलाय त्यामुळे घरात मी आणि सुनिधी दोघीच.



मी दरवाजा उघडला आणी एकदम “आं!!” केलं. आज दुपारभर लाईट नव्हते. टी एन ई बी ची लोकं काहीतरी खुसधुस करत होते. पण तेव्हा इतकं छान सरप्राईझ मिळेल असं वाटलं नव्हतं. चक्क नवीन स्ट्रीट लाईट्स. ते पण एल ई डी वाले. आमची अख्खी गल्ली रोशन रोशन झालेली.
दरवाजा उघडताक्षणी लेक बाहेर धावत गेली. शेजारीण, पलिकडची शेजारीण. तिच्या पलिकडची शेजारीण अशा सर्व रस्त्यांत उभ्या होत्या. आमचं नेहमीचं मिनिसंमेलन भरलं होतं. त्यांची मुलं रस्ताभर धावत होत्ती, माझी लेक त्यांना सामिल झाली.


“डेली मॉर्निंग वॉक!” वनिता माझ्या पाठीत गुद्दा घालत म्हणाली. “आता लाईट्स चांगले आहेत. पहाटे रोज उठून फिरता येईल.” मी मान डोलावली. या आधी पहाटेचे पाच वाजता फिरायला जायचे आमचे मनसुबे अनुक्रमे कुत्रा, गाय आणि रस्त्यात मध्येच पार्क केलेली बाईक यांनी उधळले होते. कुत्रे आमच्यामागे लागले, गायींनी केलेल्या प्रातर्विधीमध्ये वनितानं पाय घातलेला आणि त्या उभ्या असलेल्या बाईकला मी जाऊन धडकलेले. सगळं एकाच दिवशी नव्हे.  “आजपासून मॉर्निंग वॉक”करायचा असं दोन तीन महिन्यातून एकदा आम्ही ठरवतो. मग आज की उद्या की परवा अशा चर्चा घडत राहतात..मग क्वचित एखाददिवशी मी लवकर उठते, तिला फोन करते तर ती उचलत नाही, मग आम्ही परत चर्चा करत राहतो. नंतर साताठ दिवसांनी ती लवकर उठून मला फोन करते, तेव्हा मी गाढ झोपेत असते. मग कधीतरी मुहूर्त लाभतो आणि आम्ही घराबाहेर पडतो. मग आहेतच... कुत्रे, गायी आणि बाईक.



आता अशी काहीच कारणं द्यायची गरज नाही कारण रस्ता पूर्णच उजळून निघालाय. आता रात्रीअपरात्री फिरायला भिती वाटणार नाही. लाईटचा एक पोल आमच्याच घरासमोर असल्यानं आम्हाला तर आता पुढच्या अंगणामधला लाईट लावायचीदेखील आवश्यकता नाही. इतका मस्त उजेड आहे.


आम्ही लगेच गच्चीवर जाऊन सगळ्या गावाचा नजारा पाहिला. गाव काय छान दिसत होतं! इथं रहायला आलो तेव्हा मी “महिनाभर सुद्धा राहाणार नाहीय, नवीन जागा शोध” असं नवर्‍याशी भांडभांड भांडले होते. महिने जाता जाता तीन वर्षं झाली. तीन वर्षं. आणि आम्ही इकडचेच होऊन गेलो.



इथं रहायला आलो तेव्हा, रस्त्यांवर लाईट्स नव्हते. अधेमध्ये कुठेतरी एखाद्या पोलवर ट्युबलाईट होत्या. त्यांचा उजेड जेमतेम. रस्ता पण नव्हता. कच्चा लाल रस्ता. मागच्या वर्षी इथं डांबरी रस्ता झालाय. आम्ही आलो तेव्हा किराण्याची जेमतेम दीड दुकानं होती, आता “सुपरमार्केट” असा शेरा घेऊन चार पाच दुकानं उपलब्ध आहेत. सुरूवातीला “किराणा घरी पोचता कराल का?” या प्रश्नाला “चला फुटा इथून. उचलून न्यायचं तर न्या नाहीतर राहूदेत” असं उत्तर मिळालं होतं. आता या सुपरमार्केटचे मालक “फोन करदो हम घर भेजेंगा” असं सांगतात. तरी अजून गावात एकही फोनवर ऑर्डर घेणारं हॉटेल आलेलं नाही. ते चालू झालं की एकदमच झकास वाटेल.



आमचं हे गाव कागदोपत्री “चेन्नई”मध्ये येतं. पण प्रत्यक्षात आम्ही चेन्नईपासून बरेच दूर आहोत. मध्ये एक मोठा इंडस्ट्रीअल एरीया आहे. एन्नोरपोर्टला जाणारा हायवे आमच्या गावावरून जातो त्यामुळे ट्राफिक जाम हा आमच्या पाचवीलाच पूजलेला आहे. चेन्नईमध्ये जाणंयेणं अतिमुश्किल वाटावं असं इथलं पब्लिक ट्रान्स्पोर्ट आहे. पण हळूहळू चीटशीट मिळत गेल्या आणि मद्रासमध्ये एकटीनं फिरणं जमायला लागलं.



तीन वर्षांपूर्वी रेल्वे स्टेशनवरून बाहेर पडून टॅक्सीत बसलो तेव्हा आजूबाजूच्या गर्दीनं, धुळीनं आणि घाणीनं बेजार झालो होतो. पहिल्याच क्षणी मद्रास अजिबात आवडलं नाही. स्टेशनवरून आम्ही या आमच्या भागाकडे निघालो आणि हे शहर अजिबात रहाण्यालायकदेखील नाही, असा शोध लागला... कारण त्या ड्रायव्हरनं मद्रासमधले तमाम रस्ते सोडून आमच्या या भागाकडे येण्यासाठी डंपिंग ग्राऊंडमधला रस्ता निवडला होता.



“दैंया ये मे कहां आ फंसी” असं गाण्ं मनातल्या मनात वाजायला लागलं. सोबत नवरा आणि दोन वर्षांची मुलगी आणि नवरा. आम्ही तिघंच. इतक्या  मोठ्या शहरात कुणीही ओळखीचं नव्हतं. भाषा येत नाही, ओळखपाख नाही आणि जवळ कुणीच नातेवाईक नाही...
स्टेशनवरून जवळजवळ दोनेक तासांचा प्रवास करून “मनाली न्यु टाऊन”ला पोचलो. नावावरून हे एखादं छोटंसं टुमदार उपनगर वगैरे असेल असं वाटलं होतं. वेल, छोटंस आहे, टुमदारही आहे. पण उपनगर नाही, खेडेगाव आहे. टाऊन असं नाव असूनदेखील आम्ही खेड्यांतच राहतोय.



पण गेल्या तीन वर्षांत या गावानं, या घरानं आम्हाला बरंच काही दिलं. “कशी लोक राहतात इथं?” असा प्रश्न सुरूवातीला पडायचा, मग हळूहळू या गावाच्या प्रेमात पडत गेले. या शहराच्या प्रेमात पडत गेले. मुंबईच्या जुहू चौपाटीपेक्षा मरीना बीच किती स्वच्छ आहे, आणि पुण्याच्या पब्लिक ट्रान्स्पोर्टपेक्षा इथलं ट्रान्स्पोर्ट किती जास्त फालतू आहे, यावर चर्चा वाद घडायला लागले. आधी भेळवडापावच्या आठवणीनं डोळ्यांत पाणी यायचं. आता बोंडा-सुंदल कुठं चांगले मिळतात याची माहिती जमा व्हायला लागली. एकेकाळी इडली डोशा केवळ नाश्त्याचे पदार्थ होते. आता लंच डिनरचे आयटमसुद्धा झाले.
खूप आधी एकदा आयपीएलच्या दरम्यान दोनतीनदा चेन्नईला आले होते. पण तेव्हा शहर भेटलंच नव्हतं. आता एकदम कडकडून भेटलं. ओळखीचं झालं आणि “माझं शहर झालं”



मद्रास ही मेट्रो सिटी खरंतर नावापुरतंच आहे. मुळात या शहराचा आत्मा खेडेगावाचा आहे.  इथं मुंबईसारखं धावतं लाईफ नाही. निवांत संथ गतीनं आरामात सर्व कामं चालतात. रात्रीअपरात्री मुलीबाळींना इथं फिरायला काही वाटत नाही. इथलं नाईट लाईफ म्हणजे पब आणि डिस्को नसून दाक्षिणात्य शास्त्रीय संगीताच्या कचेरी असतात. अशा संगीत महफीलिंना तरूण म्हातारे सर्वचजण मनापासून आनंद घेताना दिसतात. “बिर्याणी” हा इथल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. मरीना बीच हा मद्रासचा केंद्रबिंदू आहे, इथे हीरो हे केवळ आवडते नसतात तर ते “देवस्थानी” असतात. पिक्चर पाहणं हा इथला टाईमपास नसतो तर ते एक नैमित्तीक कार्य असतं. अत्यंत कलासक्त, रसिक आणि प्रेमळ असं हे माझं सध्याचं गाव. आधुनिकता आणि परंपरा यांचं मिश्रण असलेलं हे गाव.





मद्रासमध्ये येऊन तीन वर्षं झाली असं वाटतसुद्धा नाहीये. यापुढचे लेख अशाच या मद्रासमध्ये राहण्याच्या अनुभवांबद्दल. इथल्या ठिकाणांबद्दल, खाद्यपदार्थांबद्दल, भटकंतीबद्दल, मैत्रीबद्दल आणि एकूणातच मद्रासबद्दल. 

Sunday 6 September 2015

संंध्याकाळ

दिवसाभरामधली माझी सर्वात नावडती वेळ. संध्याकाळ. तिन्हीसांज. दिवस ढळायला आलेला असतो, रात्रीची कुठेतरी सुरूवात असते. सूर्य मावळतो, पण जाताजाता थोडाफार उजेड ठेवून जातो. हळूहळू तो उजेड काळोखानं निवळायला लागतो. आणि माझ्या मनाला कायमचीच हुरहूर लागते.
.. एक कसलीतरी अजब उदासी मनावर फिरू लागते.
संध्याकाळ नकोशी वाटते. कशाचीही अखेरच नकोशी वाटते. बहुतेक संध्याकाळी या घरात कोंडलेल्या अवस्थेमध्ये जात असतात, मच्छर येतील म्हणून दारंखिडक्या सर्व गच्च बंद करून बसायचं. बाहेर हळूहळू धूसर होत जाणारा त्या उजेडी-काळोखाचं मिलन बघायचंच नाही. श्वास रोखून धरल्यासारखं गच्च कोंडलेल्या अवस्थेमध्ये घरातच खुरटायचं...
संध्याकाळ ही प्रेमी लोकांची आवडती वेळ असते म्हणे. शाम हंसी, शाम जवां, शाम ढले वगैरे कित्येक गाण्यातून शेरोशायरीमधून ते झळकत असतंच. आमची गट्टी मात्र तलतच्या रेशमी आवाजामधून ठिबकणार्‍या शामे गम सोबतच जास्त जमणारी.  हल्लीहल्ली तर जास्तच. पण तो काळ असाहोताकी, संध्याकाळसुद्धा रोमॅण्टिक वाटायची. क्वचितच कधीतरी पण वाटायचे खरी.
सूर्यास्त झाल्यानंतर दिवस संपतो म्हणे. मग सुरू होते ती भुताखेतांची वेळ. करकरीत तिन्हीसांज चढत चढत जाते ती मध्यरात्रीपर्यंत. हा सगळा वेळ त्यांचा. जे काही अमानुष आहे, भयंकर आहे, भितीदायक आहे, आपल्या आकलनाबाहेरचं आहे- ही वेळ त्यांची. अंधाराच्या येण्याआधी देवासमोर दिवा लावायचा. शांत तुपाच्या वातीमध्ये जळत असलेली ती दिव्याची इवलाली ज्योत या सर्व अमानवी शक्तींसमोर पूर्ण शक्तींनिशी उभी ठाकून राहते. अमानवी शक्ती आहेत की नाहीत, हे मला माहित नाही, पण तरीही संध्याकाळी घरामध्ये लावलेला तो दिवा मला खूप आश्वासक वाटू लागतो.
तेवढ्यापुरतं बरं वाटतं पण तेवढ्याच पुरतं.... दबकत दबकत उदासी फेर धरून येतच राहते. किंबहुना उदासी हाच संध्याकाळचा स्थायी गुण असावा.
अशीच तीही उदासभरली संध्याकाळ.
ऑफिस सुटल्यावर घरी आले. ऑफिस सुटतं  पाच वाजून तीस मिनिटांनी मी घरी येते पाच वाजून पस्तीस मिनिटांनी, ते पण रमतगमत चालत आले तर. सकाळी ऑफिसला जाताना उशीर झाला तर तीन मिनिटांत पोचतेच. घराच्या समोर ऑफिस आणि ऑफिससमोर घर. मध्ये फक्त एक लांबच लांब पसरलेला रिकामा प्लॉट. आज दिवसभर ऑफिसात काम असं काही नव्हतंच. अख्खा वेळ याच्याशी त्याच्याशी बोलण्यात गेलेला.
घरी येऊन फ्रेश झाले. चहाकॉफीची काहीच सोय नाहीच, त्यामुळे येतानाच ऑफिससमोरच्या टपरीवरून वडापाव आणि चहा आणला होता. चहा गार व्हायच्या आधी पिऊन घ्यायला हवा. रात्री जेवणाचीही काही सोय नाही, बाहेरून ऑर्डर करावी लागेल. घरात करण्यासारखं काहीही नव्हतं. कंप्युटर नाही. टीव्ही नाही. पुस्तकं नाहीत, बोलायलापण कुणी नाही, एकाकीपणा सगळीकडून भरून आल्यासारखा. रिकाम्या घरासारखं वाईट काहीही नसतं.
फोनची बॅटरी संपत आली होती, तो चार्जिंगला लावला, त्याक्षणी शुभ वर्तमान कळाले. लाईट गेलेले होते. म्हणजे निवांत फोनवर गप्पा मारण्याचं ठरवलं होतं तेही गेलं. प्लास्टिकच्या पिशवीमधला चहा कपात ओतून घेतला. पावणेसहा होत आले होते.. हॉलमधल्या मोठ्या खिडकीला आता पडदे नाहीयेत. उघडीबोडकी दिसतेय ती खिडकी. तिथून बाहेर पहायलासुद्धा नको वाटतंय. बेडरूममधली खिडकी त्याहून लहान आहे. पण तिलाही पडदे नाहीत.
मच्छर यायची वेळ झाली म्हणून खिडक्यांच्या काचा ओढून घेतल्या. पण लगेच आता गरम होइल... खिळ्याला अडकवलेली गच्चीची चावी घेतली. मी ज्या फ्लॅटमध्ये भाड्यानं राहते त्यांचं हे स्वत:चं टेरेस. एरवी कायम कुलूपबंदच असतं. क्वचित सुट्टीच्या दिवही कधीतरी तिथं जाऊन वारा खात बसायचं. गच्ची म्हणजे काय फार मोठी नव्हेच, एका रूमइतकीच. पण त्याला वर मोकळं आकाश आहे, आणि दोन बाजूंनी भिंती नाहीत म्हणून गच्ची म्हणायचं.


गच्चीत घरमालकाचीच एक पत्र्याची खुर्ची आहे. जेमतेम अर्धा जिना चढून चहाचा कप घेऊन मी तिथं निवांत येऊन बसलेय. समोरची दिशा पश्चिम.. इथं बसलं की छान सूर्यास्त दिसतो. बिल्डिंगला लागून एक छोटा गावठाणातला रस्ता. त्यावर फारशी रहदारी नाहीच. त्याच्या पुढें रिकामा प्लॉट आणि मग त्याच्या समोर माझ्या ऑफिसची पिरॅमिडच्या आकारात बांधलेली विचित्र बिल्डिंग. प्लॉट आणि ऑफिसमध्ये मुख्य हायवे. त्यावरून गाड्या सणाणत धणाणत उधळत जाताहेत. या रस्त्यावर अद्याप सिग्नल नाहीत.  ट्राफिकचे नियम वगैरे गोष्टी तशाही ऑप्शनलाच असतात. तिथं कुणीतरी  अपघात प्रवण क्षेत्र असा बोर्ड टांगलेला आहे. दॅट शूड सम माय लाईफ ऍज वेल. साली सगळी जिंदगीच अपघात प्रवण. जरा कुठं सावरतंय म्हणेपर्यंत काहीतरी घडतंच. अचानक. अनपेक्षित आणि मग त्यानंतर सगळंच उलट सुलट पलटून जातं.


ऑफिसच्या बिल्डिंगपाठीमागे खाडी आहे. तिथून येणारा तुफान वारा जाणवतोय. खारा समुद्राचा वारा. सूर्य हळूहळू मावळायला निघेल. क्षितिजाच्या आसपास पोचला की मला दिसणार नाही. कारण अध्येमध्ये बिल्डिंगी आहेत.


चहा निवत चाललाय, पण प्यावासा वाटत नाही. माझ्या हातचा चहा किती छान दाट मसालेदार होतो, हा खूप पांचट आहे, मीच मला सांगते. आणि मग अचानक दचकते. “माझ्या हातचा चहा” हे आक्रित नक्की घडलंय कधी? मागे कधीतरी मीच घरी पुरणपोळ्या केल्या होत्या. आठवतंय? माझं घर.. माझा संसार... माझं आयुष्य!!! सगळंच हातातून सुटून निघाल्यासारखं निघालंय. परत एकदा डोक्यामधले शंकासूर नाचायला लागतात.


चहा होता तसाच एका घोटात पिऊन टाकला. चहा प्यायल्यासारखं वाटलंच नाही... पण ठिक आहे.


हा जो समोर रिकामा प्लॉट आहे ना तो खरंतर रिकामा नाही, त्याच्यावर एक अर्धवट बांधलेली बिल्डिंग आहे. गेली कित्येक वर्षं त्या जमिनीची कसली त री कोर्ट केस चालो आहे म्हणे. मी इथं पहिल्यांदा राहिला आले तेव्हा वाटलं की जर या बिल्डिंगचं बांधकाम चालू झालं तर आपलं काही खरं नाही, हॉल आणि बेडरूम दोघांच्याही खिडक्या एकदम समोरच की, त्या मजूर लोकांना वगैरे. बांधकामाची धूळ वगैरेचे त्रास तर होणारच. तेव्हा तडक दोन तीन दिवसांत मोहम्मद अलि रोडवर जाऊन जाड कापड आणलं आणि शिवून लगेच पडदे लावले. गेल्या दोन वर्षांत सुदैवानं ते बांधकाम काही चालू झालं नाही, आणि आता चालू झालं तरी पडदे जागेवरच नाहीत. तेपडदे कालच रात्री मी खोक्यात भरलेत. नवीन घरी वेगळे पडदे आहेत, म्हणजे हे पडदे लावायची गरज नाही. लक्कन सुरीनं एखादा तुकडा कापावा असं काहीतरी अचानक वाटून येतंय.  
हळूहळू अंधार पडत चाललाय. किंवा उजेड गायब होत 


चाललाय. कसं बघाल तसं म्हणा. सूर्यास्त झाला असणार. सगळ्याच भागाचे लाईट्स गेलेत त्यामुळे एरवी यावेळेपासून दिसणारे चमकणारी दुकानांची नावं हॉटेलचे बोर्ड वगैरे काहीच नाही. सगळीकडे दाटून राहिलेला तो गच्च राखाडी अंधार.
भणाण वारा सुटलाय. केस अस्ताव्यस्त उडतायत. पण सावरावेसे सुद्धा वाटत नाहीत. डोळ्यांवरचा चष्मा काढून बाजूला ठेवला. डोळे शांत मिटून वारा अंगाखांद्यावर घेत राहिले

.
आजचा दिवस संपला. खर्‍या अर्थानं संपला. 


आता येणार रात्र. काळी काळोखानं भरलेली. दिवस आणि रात्रीच्या मध्ये कुठंतरी हिंदकळत असलेली ही संध्याकाळ. इथून पुढं जे काही आहे त्याची काहीच कल्पना नाही, जे काही घडून गेलंय त्याचं आता काहीच होऊ शकत नाही. तो भूतकाळ झाला. दिवसाचा भूतकाळ आणि रात्रीचा भविष्य काळ यांच्यामध्ये कुठंतरी असलेलं ही वर्तमानाची संध्याकाळ. डोळे मिटल्यावर क्षणाक्षणाला काहीबाही दृश्यं नजरेसमोरून जायला लागतात. या घराशी जोडलं गेलेलं पहिलं नातं. कोयरीच्या पैठणीचा पदर उलगडावा तश्या आठवणी उलगडल्या जातायत. आठवायचं म्हटलं की काहीच आठवत नाही. सहजच डोकावल्यासारख्या स्मृती येतायत आणि जातायत.



घर ताब्यात घेतल्यावर आयुष्यात पहिल्यांदा केलेली झाडू फरशी सारखी कामं. तीपण एकटीनंच. नंतर  एकटीनंच बसून केलेली ती देवपूजा आणी मग दूध उतू घालवायचा विधी. हे खरंतर उगाचच. आई म्हणाली कर म्हणून. पण मग त्यानंतर पहिल्यांदाच करून घेतलेला चहा.. ऑफिसात सर्व चिडवतात, इतका गोड बासुंदीसारखा चहा पितेस म्हणून. पण मला चहा असाच लागतो. घट्ट, गोड आणि भरपूर उकळलेला. हा फ्लॅट भाड्यानं घेताना एजंट म्हणाला होता की याचा पायगुण चांगला आहे, जो कुणी इथं राहून गेलाय त्याचं चांगलंच झालंय.




इथं राहून माझं काय झालंय? चांगलं की वाईट? मुळात दोनतीन वर्षाचा कालावधी अश्याच दोन शब्दांमध्ये वर्णन करून संपतो का? चांगलं आणि वाईट! आज्जी गेली ती याच घरात असताना. प्रमोशन झालं ते याच घरात असताना. लग्नासाठी विनाकारण नकार ऐकले ते याच घरत असताना. “लग्न करेन तर तुझ्याशीच” असं तो म्हणाला तेही याच घरात असताना. मलेरीयाच्या तापानं रात्रभर एकटीच फणफणले तेही याच घरात असताना, आणि त्याच्या ओठांचा स्पर्श माझ्या ओठांना झाला तोही याच घरात असताना. काय चांगलं आणि काय वाईट... कसं ठरवणार? दिवसानंतर रात्र येते आणि रात्रीनंतर दिवस येतो, संध्याकाळच्या या किर्र वेळी बसून रात्र चांगली की दिवस वाईट हे कसं ठरवणार?


मुळात जे घडलंय ते चांगलं के जे यापुढं घडणार आहे ते चांगलं. भविष्याची आजवर कधी भिती वाटलीच नाही... कारण भविश्यामध्ये कसलीच अनिश्चितता नव्हती, काळजी नव्हती. एकाकी भविष्याची किती म्हणून तमा बाळगायची...

मनामध्ये अजून गणितंच चालू आहेत. संपलेल्या दिवसांचे हिशोब होत आहेत. हरवलेल्या रात्रींचे अजून बाकी आहेत. भोवतालचा उजेड सेकंदासेकंदाला कमी होत जातोय. अजून लाईट आलेले नाहीत. सूर्य मावळल्यावर जाणवतंय. मळभ दाटलंय. पाऊस तर पडणार नाही, पण या मळभानं माझ्या मनातली उदासी अजून गहिरी होतेय त्याचं काय...


खरंतर उदास वाटायला नको. आनंद वाटायला हवा, पण वाटत नाहीये हेही खरंच. कुठून्तरी मनामध्ये काहीतरी आत आत तुटत चालल्यासारखं वाटतंय. माझंच काही तरी चुकतंय़ का? किती दिवस आपण या दिवसाची वाट पाहिली. काय –काय नि कसं कसं ठरवून ठेवलंय. अमुक करू, तमुक करू. मग आज अचानक या स्वप्नांपेक्षा हा एकटेपणा अचानक का महत्त्वाचा वाटायला लागलाय? काय बदलणार आहे नक्की? आयुष्य आहे, ते पुढे जाणारच. मागे काही व्यक्ती आयुष्यातून वजा झाल्या, आता काहींची बेरीज होणार.. आयुष्य आहे, ते पुढे वाहणारच. पण गणीतासारखंच आयुष्य इतकं कॉम्प्लीकेटेड का करून ठेवलेलं असतं आपणच..


हे घर ही वास्तू... आपल्या आयुष्यामध्ये केवळ दोन वर्षांसाठी आली. त्या दोनच वर्षांनी आपलं अख्खं आयुष्य डीफाईन होऊ शकतं का..


का नाही होऊ शकत? माझ्या केवळ एका निर्णयानं जर माझं आयुष्य बद्लू शकतं तर या दोन वर्षांमुळे आयुष्याचा लेखाजोखा मांडला जाऊ शकत नाही का? या दोन वर्षांनी मला घडवलं. अगदी छोटया छोट्या गोष्टीमध्ये मी कोण आहे आणी मला काय हवंय हे मला सांगितलंय.


म्हणजे मला काय हवंय हे मला स्पष्ट माहित असतानासुद्धा मी हा जुगार का खेळतेय.. जुगारच नाहीये का? जोपर्यंत निर्णय तुमचा तुम्ही घेत असता तो पर्यंत तो जुगार नसतो,. पण ज्या क्षणापासून तुमचे निर्र्णय दुसर्‍या कुणावर अवलंबून रहायला लागतात तेव्हापासून जुगार चालू होतो. फासे पडायला सुरूवात होतेच.



रात्र अंधारी असते म्हणून इतकी गूढ असते का? की ती गूढ असते म्हणून अंधारी होऊन येते. निर्णय घेण्याआधी जी घालमेल अस्ते ती फारच सुसह्य असते. निर्णय घेऊन झाल्यावर जी वाट पहावी लागते ती मात्र जीवघेणी असते. इट्स डन. तू हे ऑलरेडी निवडलं आहेस. हा निर्णय तुझा आणी फक्त तुझाच होता. मी स्वत:लाच समजावण्याचा निष्फळ प्रयत्न करतेय. पावसाचे चुकारमुकार थेंब आकाशामधून खाली येऊन त्यामध्ये  उगाच स्वत:ची हांजी सांगून जातात. हा असला रिप्चिप पाऊस मला बिल्कुल आवडत नाही. बावा, पडायचंय ना तर सणकून कोसळ. असा कोसळ की मनामध्ये आणि डोळ्यामध्ये केवळ तूच राहशील. मग कदाचित इतकी सैरभैर होणार नाही मी. दोन पावलं कधीचीच पुढं टाकलीत. आता कितीसं अंतर उरलंय? पण तरीहे अंतर चालताना जीव मेटाकुटीला आलाय हे मात्र खरं. इतके दिवस मनामध्ये केवल प्रश्न होते, आज आता या क्षणी मात्र त्या प्रश्नांनी वादळ चालू केलंय.



चुकलं तर मागे फिरायचा रस्ता शिल्लक नाही. निर्णय चुकला तर “वेगळं” होता येईल पण परत हे असं “एकटं” होता येणार नाही. एकाकी, एकटं, बेफाम, बेफिकीर, बिनधास्त आयुष्य. माझं आयुष्य!!
टिपिकल भारतीय मध्यमवर्गीय विचारसरणीमध्ये लहानाची मोठी होऊनसुद्धा मी का या एकाच विषयाबद्दल इतकी का साशंक आहे. बरोबरीच्या मुलींनी अगदी नेटवर चॅट करून दहा दिवसांत लग्नंसुद्धा केली. त्या खुश आहेतच की. मला ते जमणारच नाही. प्रश्न केवळ खुशीचा नाही, मुळात बेसिक प्रश्न एकच आहे... का? “लग्नच का करावं?” हा प्रश्न मी स्वत:ला कित्येक्दा विचारतेच आहे. उत्तर मिळत नाही. मी लग्नाला नकार दिलाय याचा अर्थ त्यानं सोयिस्कररीत्या “त्याला” नकार दिलाय असा लावून घेतलाय... त्यावरून चिडला,, भांडला, हातदेखील उगारला. पण मला तो हवाय पण “लग्न” हे कृत्रिम नातं नकोय हे त्याला समजत नाहीये.. कसं समजणार?


घड्याळात किती वाजले होते कुनास ठाऊक... कितीवेळची इथं एकटीच बसून आहे. काळोख पूर्ण दाटलाय. लाईट नाहीतच. अंधारातच जिन्यावरून खाली आले. चाचपडायची वगैरे काही गरज नाही. इतका हा जिना सवयीचा झालाय. दाराची कडी उघडून आत आले. माझ्या घरामध्ये मला वावरायची चांगलीच सवय. रात्रीअपरात्री जाग आली तर एकही दिवा न लावता मी घरभर आरामात फिरू शकते. आजही फिरेनच...


आईग्गं! या कळवळ्या शब्दानंतर स्वत:साठी एकच इरसाल शिवी घातली. हा खोका इथं वाटेत मीच सकाळी ठेवलाय. दोन वर्षांतल्या सवयीमध्ये पायाला या खोक्याची सवय नव्हती. चांगलाच जोरात लागलाय. आता मात्र स्वत:वरचा आत्मविश्वास थोडाडळमळतोय. हातानं चाचपडत मला खुर्ची कुठे सापडतेय का ते बघते.  हाताला टेबल लागलंय, त्यावरचा मोबाईल. अजून बॅटरीमध्ये थोडी धगधुगी आहे. काही म्हणा, हे जुने नोकियावाले मोबाईल बॅटरीच्या बाबतीत फार दणकट होते. बाहेर पाऊस अजून झिमझिमच पडतोय. दिवसभर घरात साचलेला तो कुबटपणा आता संध्याकाळपासून खिडक्या बंद असल्यानं अजून जास्त जाणवतोय.


हाताशी जवळच ठेवलेल्या सॅकमधून टॉर्च शोधते. त्यानंच काल सांगितलं होतं आयत्यावेळी अलगनार्‍या वस्तो हाताशी राहू देत. इतर सर्व सामान मी कालच पॅक केलंय.


तिन्ही सांजेच्या त्या अर्धवट काळसर उजेडामध्ये मी एकवार माझ्या घरावर नजर फिरवली. दोनच खोल्या, पण त्याही रिकाम्या, भकास. गेल्या दोन वर्षांमधला संसार सगळा खोक्यांमध्ये रचून ठेवलाय. आजची रात्र या घरामधली शेवटची रात्र..


पण त्या रात्रीच्याही आधी असह्य होत जाणारी ही जीवघेणी संध्याकाळ. कधी एकदा पूर्ण रात्र पडतेय असं वाटायला लावणारी कातर कातर संध्याकाळ. खिडकीजवळ खुर्ची आणून बसलेय. वेळ जाता जात नाहीये. पण वेळ जाण्यासाठी काही करण्यासारखंदेखील नाही.


गेली आठ दिवस पॅकिंग करतेय. आधी क्वचित लागणार्‍या वस्तू. मग कपडे. मग किचनमधलं सामान. आज सकाळी ऑफिसला जायच्या आधी गॅस सिलेंडर परत केला. शेगडी खोल्यात घालून पॅक केली. संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर पाटावर ठेवलेले देव आणि असंच उरलंसुरलं सामान पॅक करायचं होतं. पण आता लाईट नाहीत म्हणून देव अजून तसेच आहेत.


तश्याच त्या काळोखामध्ये उठले. नकळत हात जोडले. मी काही फारशी देवभक्त वगैरे नाही... पण तरी आता या क्षणाला देवांचं अस्तित्व हवंहवंसं वाटत होतं. कुणीतरी माझी या आततायी निर्णयामध्ये पाठराखण करतंय असं सांगायला हवंय. अंधार असूनसुद्धा सवयीनं निरांजन लावलं. तुपातल्या निरांजनाचा स्निग्ध प्रकाश पाटावर पडला. बालगणेश तो प्रकाश पाहून गालातल्या गालात हसला. मी परत हात जोडले. “मला कधी विसरू नकोस” मी हळूच कानात सांगितल्यासारखं कुजबुजले.


तो विसरेल किंवा आठवणीत ठेवेल. पण त्याच्या भरवश्यावर मला राहता तर येणार नाही. परत एकदा मनावर उदासीची गर्द छाया अंधारून आली. अचानक माझंच मला जाणवलं. संध्याकाळ फक्त बाहेरच होत नाहीये. कुठंतरी माझ्या मनामध्ये पण होतेय. इतके दिवस असलेला आनंदाचा उजेड हळूहळू काळोखा होत चाललाय. साशंकतेची काजळी रात्र बनत चालली आहे.



मोबाईल आता मात्र बंद पडलाय. मघाशी दिसणार्‍या उजेडात पाहिलं होतं तेव्हा साडेसात वाजले होते. लाईटचा अद्यप पत्ता नव्हता. किती वाजले होते त्याच्याशी आता काही देणंघेणं नव्हतंच. घरात नेहमी घालायचा टीशर्ट पायजमा घालूनच बाहेर पडले. नाहीतरी आपल्याला उद्या इथून जायचंय. कोण काय म्हणणार आहे? इतके दिवस तरी कुणाच्या म्हणण्याला काय किंमत दिली? घराजवळच्या हॉटेलामध्ये थाळीची ऑर्डर दिली. फोनवरून हेच मागवलं असतं पण आता फोन बंद पडला होता. अवघ्या तीन चार तासांपूर्वी ठरवलेल्या प्लानचा इतका मस्त फज्जा उडताना डोळ्यांसमोर दिसत होता. आणि मी अख्ख्या आयुष्याचे प्लान रचायला बघत होते. वेड लागलंय बहुतेक मला. हॉटेलात पण लाईट नव्हते. इव्हर्टरच्या जीवावर कुठंतरी तीन चार ट्युबलाईट मिणमिणत होत्या, इतकंच. उजेड एक तर लख्ख असावा नाहीतर संपूर्ण काळा काळोख. या असलय मिणमिणत्या उजेडात माझं डोकं दुखायला लागतं. वेटरनं आणून दिलेलं जेवण मुकाट गिळलं.


संध्याकाळ आता रात्र बनली होती. पण नेहमीची प्रसन्न रातराणी वगैरे नव्हे, तर संध्याकाळचीच उदासी अजून गहिरी झाल्यासारखी रात्र. इतके दिवस आपला निर्णय कदाचित चुकीचा आहे, असं वाटत होतं. या राखाडी ढगाळ संध्याकाळीनं त्यावर जणू शिक्कामोर्तबच केलं. माझं चुकलंय का? मी माझं आयुष्य दुसर्‍या कुणाच्या हाती सोपवायचा विचारच कसा करतेय.. घरी आले तेव्हा पाऊस किंचित जोरात चालू झाला.


करण्यासारखं काहीच नसल्यामुळे बेडवर येऊन पडले. त्याला सांगावं का... नाही येत मी तुझ्यासोबत. आपण वेगळेच राहू. किंबहुना आपण वेगळेच होऊया. मला एकटंच रहायला आवडेल. किती दिवस एकटी राहशील हा प्रश्न तो विचारणारच. त्याचं उत्तर मात्र माझ्याकडेही नाही. माझ्या या एकटेपणाच्या बदल्यात मला तू हवा की नको... या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. प्रेम, रोमान्स, मोहब्बत वगैरे संकल्पनांवर माझाच काय त्याचाही विश्वास नाही. आपण उर्वरीत आयुष्य एकमेकांसोबत काढू शकतो का हाच केवळ प्रश्न. त्याचं उत्तर होकारर्थी, माझं नकारार्थी!


“एकटी राहून तू सिनिकल होत चालली आहेस” तो मधूनच मला एकदा म्हणाला होता. असेलही कदाचित. पण हा एकटेपणा मला मनापासून भावतोय हे समजायला इतकं कठीण आहे का?


विचारांचा हायवे सुरू झाला की एक बरं असतं. मेंदूला काही कामच नसतं. कंप्युटरच्या गेममध्ये कसे कुठूनही कुणीही येत राहतात तसे कुठल्याही कोपर्‍यात साठवलेल्या आठवणी येतच राहतात. डोळे मिटून पडून राहिले.


आजची ही शेवटची रात्र. उद्यापासून तो सोबत असणार...


किंवा कदाचित नाही. श्या!! फोन चालू असता तर आताच फोन करून सांगितलं असतं... नको म्हणून. लाईट असते तर आता सगळं सामान खोक्यामधून काढायला  सुरूवात केली असती. माझा संसार. माझं घर. माझं आयुष्य.


विचार करता करता कधी डोळा लागला कळलंच नाही. गेली दोन-तीन रात्री पॅकिंग करत बसल्यानं धड झोप लागलीच नव्हती...
जाग आली ती टणाटना वाजाणार्‍या बेलमुळं. जागी झाले तर दोन सेकंद कळेचना, मी कूठं आहे...माझं घर पूर्णपणे अनोळखी होऊन माझ्याकडे टक्क बघत बसलं होतं. रात्री झोप लागल्यावर कधीतरी लाईट आले होते. मी झोपताना बहुतेक सर्व दिवे चालू ठेवले असणार. बेल परत एकदा वाजली. भिंतीवर घड्याळ नव्हतं, किती वाजले माहित नाही. बाहेर पाऊस जोरजोरात बरसत होता. मध्यरात्र नक्कीच होऊन गेली होती.


दार उघडलं तेव्हा तो बाहेर चिंब भिजून उभा होता. “फोन का बंद आहे? केव्हाचा ट्राय करतोय. मेसेजेसलापण उत्तर नाही.” त्याचा आवाज माझ्यावर चिडल्यासारखा, वैतागल्यासारखा. पण त्या वैतागापाठीमागे दडलेली प्रचंड मोठी काळजी. ढगाळ संध्याकाळीमागे दडलेल्या वादळी रात्रीसारखी.


मी काही न बोलता पेंगुळल्या डोळ्यांनी त्याच्या गळ्यात हात टाकते.


निर्णय घेऊन झालाय, आता तो निभवायचाय. इथून पाठी फिरणं शक्यच नाही. दोघांनाही.


फासे फेकून केव्हाचे झालेत, आता दान काय पडतंय त्याची केवळ वाट बघायची.